मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असले, तरी वित्त, गृह, कृषी यांसह सर्व विभागांचे खातेवाटप अद्यापही झालेले नाही. मंत्रालयातील विविध विभागांत प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्री नसल्यामुळे सद्य:स्थितीत जवळजवळ सर्वच विभागांतील कामकाज सुस्तपणे चालू आहे.
प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच कामांविषयी निर्णय घेण्यासाठी मंत्री नसल्यामुळे सर्वच विभागांत कामकाजाची गती मंदावली आहे. मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी काममाजाअभावी रेंगाळत असल्याचे, तसेच अनेक कर्मचारी भ्रमणभाषवर व्हिडिओ पहाण्यात वेळ घालवत असल्याचे आढळून येत आहे. मंत्रालयातील काही विभागांतील अधिकार्यांशी संवाद साधल्यावर मंत्री नसल्यामुळे कामकाजाविषयी निर्णय होत नसल्याचे काहींनी सांगितले. मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नसल्यामुळे त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सरकारकडून मंत्रीमंडळातील विस्तार जलदगतीने करणे आवश्यक आहे.