तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१. महासुदर्शन घनवटी 

वैद्य मेघराज पराडकर

‘कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये कोणत्याही वयोगटामध्ये निर्धाेकपणे (बिनदिक्कतपणे) वापरता येण्यासारखे हे औषध आहे. (साभार : ‘सिद्धयोग संग्रह’ / ‘आयुर्वेद सार संग्रह’) या औषधामुळे शरिरातील तापाचे विषार मलावाटे बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते. नुकत्याच आलेल्या तापामध्ये, तसेच जुनाट तापामध्येही हे औषध लाभदायक आहे. हे औषध ताप येण्याची शक्यता असतांना घेतल्यास तापाचा प्रतिबंध करण्यास साहाय्यक ठरते.

१ अ. ताप : ताप येण्याची शक्यता असतांना किंवा ताप आलेला असतांना २ – ३ दिवस एकेका गोळीचे चूर्ण कोमट पाण्यासह दिवसातून २ – ३ वेळा घ्यावे. ३ वर्षांखालील मुलांना पाव प्रमाणात, तर ३ ते १२ वर्षे वयाच्या मुलांना अर्ध्या प्रमाणात औषध द्यावे. काही वेळा तापामध्ये कोरड्या खोकल्याची ढास लागते. अशा वेळी मात्र हे औषध न वापरता संशमनी वटीसारखे अन्य औषध वापरावे.

१ आ. पित्त होणे : घशात किंवा छातीत जळजळ होत असतांना हे औषध चावून खाल्ल्यास लाभ होतो. त्रास होईल, तेव्हा १ गोळी चावून खावी. गोळी अत्यंत कडू असते.

२. संशमनी वटी 

हे औषध नुकत्याच आलेल्या तापापेक्षा जुन्या तापामध्ये अधिक चांगले कार्य करते. (नुकत्याच आलेल्या तापामध्ये महासुदर्शन घनवटी हे औषध घ्यावे.) या औषधामध्ये गुळवेलीसह लोहभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म आणि अभ्रक भस्म हे घटक असतात. यांमुळे रक्त सकस बनण्यास साहाय्य होते. सर्वसाधारण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही या औषधाचा उपयोग होतो. कोरोना महामारीच्या काळामध्ये हे औषध फारच प्रसिद्ध झाले. गर्भवती, बाळंतीण, लहान मुले, नाजूक प्रकृतीची माणसे, तसेच वयोवृद्ध यांनाही हे औषध निर्धाेकपणे वापरता येते. दिवसातून एकेका गोळीचे चूर्ण २ वेळा घ्यावे. ३ वर्षांखालील मुलांना पाव प्रमाणात, तर ३ ते १२ वर्षे वयाच्या मुलांना अर्ध्या प्रमाणात औषध द्यावे.

२ अ. जुनाट ताप : अंगात मुरलेल्या जुनाट तापामध्ये याचा चांगला उपयोग होतो. अशा तापांमध्ये काही वेळा प्लीहा (स्प्लीन) वाढते. त्या वेळीही हे औषध उपयुक्त ठरते. हे औषध १ मास घ्यावे.

२ आ. पण्डुरोग : शरीर क्षीण होणे, थकवा आणि पण्डुरोग (हिमोग्लोबिन न्यून असणे) यांमध्येही हे उपयुक्त आहे. हे औषध १ ते ३ मास घ्यावे. यांसह रक्त वाढवणारी अन्य औषधेही घ्यावीत.

२ इ. पुष्कळ दिवसांचा खोकला : १ – २ आठवडे औषध घ्यावे. १ मासापेक्षा अधिक दिवस खोकला चालू असल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.

२ ई. श्वेतप्रदर (योनीमार्गातून पांढरा स्राव होणे) आणि वीर्यस्राव : १ ते ३ मास औषध घ्यावे.

२ उ. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मेंदू आणि पचनसंस्था यांना बळ देण्यासाठी, तसेच कोणत्याही दीर्घकाळ असलेल्या रोगामध्ये रक्त सकस बनून शक्ती येण्यासाठी : १ ते ३ मास औषध घ्यावे.

३. जयमंगल रस 

हे सुवर्णयुक्त औषध असून तापाच्या आत्ययिक अवस्थेमध्ये (इमर्जन्सीमध्ये) उपयोगी पडते. ताप १०४ अंश फेरन्हाईटपेक्षा जास्त गेल्यास एका गोळीची पूड २ चिमूट जिर्‍याची पूड आणि थोडेसे मध यांत मिसळून घ्यावी. जिरेपूड उपलब्ध नसल्यास केवळ मधासह आणि मधही उपलब्ध नसल्यास गोळी चावून खावी. (एवढ्या अधिक तापामध्ये स्वतःच्या मनाने औषधे न घेता त्वरित वैद्यांना भेटायला हवे; परंतु वैद्यांकडे पोचेपर्यंत प्राथमिक उपचार म्हणून हे औषध घेण्यास आडकाठी नाही.) या औषधात सोन्याच्या भस्मासह चांदीचेही भस्म असल्याने या औषधाचे मूल्य अधिक असते.’

औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडीफार औषधे घेतल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदाची काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२२)