‘मध्यंतरी मी काही कालावधीसाठी आश्रमातून घरी गेले होते. मी घरी जातांना संगीताचा समन्वय पहाणार्या साधिकेने मला सांगितले, ‘‘घरी शास्त्रीय संगीताचा सराव कर.’’ तत्पूर्वी काही कारणाने माझा संगीत सराव बंद होता. घरी गेल्यावर काही दिवस मी संगीताचा सराव केला. आरंभी माझा सराव तांत्रिकरित्या होत होता, म्हणजे ‘मी गातांना कुठे चुकत नाही ना ?’, याकडेच माझे लक्ष असायचे; परंतु नंतर मी सरावाला भावजागृतीचे प्रयत्न जोडल्याने सराव भावपूर्ण होण्यास साहाय्य झाले. देवाच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सरावाची संधी मिळाल्याने आनंद होऊन कृतज्ञता वाटणे; परंतु न्यूनगंडामुळे नकारात्मक विचार येणे, तेव्हा ‘पितृपक्ष चालू असल्यामुळे नकारात्मक विचार येत आहेत’, हे लक्षात येणे
आरंभी ‘मला सराव करायची संधी मिळाली’, यासाठी आनंद होऊन देवाविषयी कृतज्ञता वाटली. मी पितृपक्ष असतांना एका नातेवाइकांकडे गेले होते. माझ्या मनात स्वतःविषयी असलेल्या न्यूनगंडामुळे सरावाला आरंभ करण्यापूर्वीच ‘मला सराव करायला जमणार नाही. मला देवाला अनुभवता येणार नाही’, असे नकारात्मक विचार येत होते. तेव्हा ‘पितृपक्ष चालू असल्याने मला त्रास होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. आरंभी भावजागृतीचे प्रयत्न करतांना मन एकाग्र न होणे आणि सराव तांत्रिकदृष्ट्या होणे, नंतर भावजागृतीचे प्रयत्न करतांना मन एकाग्र होण्यासाठी नामजपादी उपाय करणे
सरावाला आरंभ करण्यापूर्वी भावजागृतीचे प्रयोग करतांना माझे मन एकाग्र होत नव्हते. त्यामुळे ‘सराव तांत्रिकरित्या चालू आहे’, असे मला वाटले. भावजागृतीचे प्रयोग करण्यासाठी डोळे मिटल्यावर माझ्या मनातील विचार वाढायचे. त्यामुळे मी माझ्यावरील त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण काढत मोठ्याने नामजप करायचा प्रयत्न केला. त्यानंतर मला आलेला जडपणा थोडा न्यून होऊन सरावाला आरंभ करता आला. नातेवाइकांकडे असतांना १० मिनिटे भावप्रयोग करून २ दिवसच सराव केला.
३. नातेवाइकांकडून घरी (बार्शी, जिल्हा सोलापूर) आल्यावर भावप्रयोग करून संगीताचा सराव करतांना सप्त स्वरांचे रंग अनुभवता येणे
नातेवाइकांकडून मी बार्शीला घरी आल्यावर प्रतिदिन भावप्रयोग करून सराव करत होते. एक दिवस सराव करत असतांना प्रत्येक स्वर आळवतांना मला वेगवेगळे रंग दिसले. ते पुढीलप्रमाणे आहेत.
४. सप्त स्वर म्हणतांना आलेली अनुभूती
४ अ. ‘सप्तस्वर चढत्या क्रमाने म्हणजे ‘सा, रे, ग, म, प, ध, नि, सां’, असे म्हणतांना माझे शरीर हलत आहे’, असे मला जाणवत होते.
४ आ. नंतर ‘सप्तस्वर उतरत्या क्रमाने म्हणजे ‘सां, नि, ध, प, म, ग, रे, सा’, असे म्हणतांना मन आणि देह शांत होत आहे’, असे मला जाणवले.
४ इ. त्यानंतर ‘ते स्वर माझ्या देहात स्थिरावत आहेत’, असे मला जाणवले.
४ ई. देवाने तानपुर्याच्या नादावर लक्ष केंद्रित करायला सुचवणे, तानपुर्याच्या नादावर लक्ष केंद्रित केल्यावर त्या नादाची स्पंदने अनाहतचक्रावर जाणवणे, तेव्हा ध्यान लागून ‘मी आणि तानपुर्याचा नाद’ एवढेच आहे’, असे वाटणे : सरावाला आरंभ करतांना देवाने मला सुचवले, ‘आज स्वर म्हणण्याआधी तानपुरा लावून त्याच्या नादावर लक्ष केंद्रित कर.’ त्यानुसार मी तानपुरा लावला. तेव्हा मला ‘त्या तानपुर्याचा आवाज माझ्या मनात आतपर्यंत जात असून अनाहतचक्रावर त्या नादाची स्पंदने जाणवली आणि नंतर तो नाद तिथेच स्थिरावत आहे’, असेही जाणवले. माझे मन त्या नादावर एकाग्र झाले. मला अन्य कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. मला केवळ ‘तो नाद आणि मी’, एवढेच असून ‘माझे ध्यान लागले’, असे जाणवले.
देवाच्या कृपेने मला संगीतातील वरील अनुभूती आल्या. त्याबद्दल मी देवाचरणी कतज्ञ आहे.’
(‘वरील अनुभूती साधिकेच्या भावापरत्वे आहेत.’ – संकलक)
– कु. मयुरी आगावणे, संगीत अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.२.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |