आयुर्वेदाची काही सुवर्णयुक्त औषधे

आयुर्वेदाच्या औषधांमध्ये ‘सुवर्णयुक्त औषधे (सुवर्णकल्प)’ उत्तम ‘रसायन’ म्हणून गणली जातात. ‘सुवर्ण’ म्हणजे ‘सोने’. सुवर्णयुक्त आयुर्वेदाच्या औषधांमध्ये सोन्याचे भस्म असते. यामुळे ही औषधे महाग असतात. असे असले, तरी ही औषधे पुष्कळ प्रभावशाली असून विशेषतः आत्ययिक अवस्थेमध्ये (इमर्जन्सीमध्ये) जीवनरक्षक (लाईफ सेव्हिंग) म्हणून उपयोगी पडणारी असतात. आयुर्वेदामध्ये ‘रसायन’ म्हणजे ‘शरिरातील सर्व उपयुक्त घटकांना उत्तम बळ देणारे औषध.’ ही शरिराची क्षमता वाढवणारी औषधे असल्याने यांचे गंभीर दुष्परिणाम नसतात. काही महत्त्वाच्या सुवर्णकल्पांचे उपयोग येथे दिले आहेत.

१. वसंत मालती रस (स्वर्ण)

यालाच ‘सुवर्ण मालिनी वसंत’ असेही नाव आहे. (संदर्भ : ‘भारत भैषज्य रत्नाकर’, भाग ४; गोळीचा आकार : अनुमाने १०० मिलिग्रॅम) याच्या उपयोगांचे वर्णन आयुर्वेदात ‘सर्वरोगे वसन्तः ।’ म्हणजे ‘सर्व रोगांमध्ये वसंतकल्प उपयुक्त आहे’, असे केले आहे. (‘वसंतकल्प’ म्हणजे ‘ज्या औषधांच्या नावांमध्ये ‘वसंत’ आहे, ती औषधे, उदा. सुवर्ण मालिनी वसंत, लघु मालिनी वसंत’. आयुर्वेदाचे ‘रसशास्त्र’ हे एक उपशास्त्र आहे. यामध्ये आलेल्या औषधांना ‘रस’ असे म्हणतात. ही औषधे बहुतेक वेळा गोळ्यांच्या स्वरूपात असतात.)

१ अ. रोगामुळे किंवा अन्य कारणांमुळे आलेला अशक्तपणा दूर होण्यासाठी उपयुक्त : ताप इत्यादी रोगांमध्ये रोग बरा झाल्यावर जो थकवा असतो, तो दूर करण्यासाठी या औषधाचा उत्तम उपयोग होतो. हे औषध शरिराला चहा किंवा कॉफी यांप्रमाणे तात्पुरती उत्तेजना देणारे नसून शरिरातील हृदयादी अवयवांना बळ देणारे आहे. १५ दिवस ते १ मास सकाळी रिकाम्या पोटी एका गोळीचे चूर्ण थोड्याशा मधात मिसळून चाटून खावे. (एका ताटलीत गोळी ठेवून तिच्यावर पेल्याने किंवा वाटीने दाब दिल्यास गोळीचे चूर्ण होते.) औषध घेतल्यावर १५ मिनिटे काही खाऊ-पिऊ नये. कोरोना महामारीच्या काळात कोरोना बरा झाल्यावरही ‘शरिरातील शक्ती निघून गेली आहे’, असे वाटणे’ हे लक्षण या औषधाच्या सेवनाने न्यून झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

१ आ. शरीर क्षीण होणार्‍या कोणत्याही विकारामध्ये शरिराची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त : क्षयरोग, शुक्रधातूची क्षीणता (वारंवार झोपेत वीर्यस्राव होऊन थकवा येणे), जुनाट अपचनाचा विकार (ग्रहणी), गळ्यांतील गाठी वाढणे (गंडमाला), पंडूरोग, जुनाट ताप इत्यादी विकारांमध्ये १५ दिवस ते १ मास प्रतिदिन एका गोळीचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी मधातून चाटून खावे.

१ इ. अतीसार (जुलाब) : पुष्कळ दिवस होणार्‍या अतीसारामध्ये याचा चांगला उपयोग होतो. दिवसभरातून फार वेळा शौचाला जावे लागत नाही; परंतु जेव्हा शौचाला जावे, तेव्हा हौदाचा बोळा काढल्याप्रमाणे भळाभळा पाणी पडते आणि शौचाला बसल्यावर एकदम पटकन शौचाला होऊन जाते, अशा प्रकारच्या अतीसारामध्ये याचा विशेष उपयोग होतो. आतड्यांची आवर घालण्याची शक्ती याने वाढू लागते. १५ दिवस ते १ मास प्रतिदिन सकाळी एका गोळीचे चूर्ण थोड्याशा मधातून घ्यावे. (थोडे थोडे; पण पुष्कळ वेळा शौचाला होत असल्यास या औषधापेक्षा ‘महालक्ष्मीविलास रस’ या औषधाचा चांगला उपयोग होतो.)

१ ई. ‘सलाईन’ मिळेपर्यंतचा प्राथमिक उपाय : काही वेळा वारंवार उलट्या आणि अतीसार (जुलाब) होऊन शरिरातील अब्धातूचा (पाण्याचा) क्षय होतो. अशा वेळी नाडीचे ठोके क्षीण होतात. अब्धातूचा क्षय भरून काढण्यासाठी ‘सलाईन’ लावावे लागते. ‘सलाईन’ उपलब्ध होईपर्यंत त्वरित एका गोळीचे चूर्ण मधातून घेतल्यास नाडीची क्षीणता अल्प होते’, असा अनुभव आहे. वैद्यांच्या सल्ल्याने इतर उपचार अवश्य करावेत.

वैद्य मेघराज पराडकर

१ उ. आत्ययिक अवस्थांमध्ये उपयुक्त : कोणत्याही आत्ययिक अवस्थेमध्ये (इमर्जन्सीमध्ये) त्या क्षणाला एका गोळीचे चूर्ण थोड्याशा मधात मिसळून चाटून खावे. मध न मिळाल्यास अर्धा चमचा तुपात मिसळून घ्यावे. तूपही नसल्यास थोड्या पाण्यात चूर्ण कालवून चघळून खावे किंवा गोळी दातांनी चावून चघळून खावी.

१ ऊ. बेशुद्ध पडणे : बेशुद्ध पडलेल्या किंवा कोमामध्ये गेलेल्या व्यक्तीला तत्क्षणी किंवा अधिकाधिक १ मास दिवसातून एका गोळीचे चूर्ण मधात मिसळून ओठांच्या आतील भागाला किंवा हिरड्यांवर लावावे. याने हे रक्तात शोषले जाते आणि आपले कार्य करू लागते.

१ ए. औषध कधी वापरू नये ? : सुवर्ण मालिनी वसंतच्या वापराने काही वेळा काहींचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढून नाक किंवा गुदद्वार यांमधून रक्त पडू लागते. त्यामुळे ज्यांना नाकाचा घुळणा फुटणे (नाकातून रक्तस्राव होणे), रक्तार्श (मूळव्याधीतून रक्त पडणे) किंवा अनियंत्रित उच्च रक्तदाब हे त्रास असतील, त्यांनी हे औषध जपून वापरावे. असे त्रास झाल्यास लगेच औषध बंद करावे. अन्य औषधांनी रक्तदाब नियंत्रित असल्यास हे औषध वापरण्यास आडकाठी नसते.

२. महालक्ष्मीविलास रस

यात सुवर्णभस्मासहित अभ्रक भस्म, वंग भस्म, शुद्ध हरताळ, ताम्र भस्म इत्यादी अन्य औषधे असतात. (साभार : ‘भारत भैषज्य रत्नाकर’, भाग ४; गोळीचा आकार : अनुमाने १०० मिलिग्रॅम) सुवर्ण मालिनी वसंताच्या वर्णनात दिलेल्या सर्व विकारांमध्ये हे औषध वापरता येते. त्यांसह पुढे दिलेल्या अन्य विशेष ठिकाणीही हे औषध वापरता येते.

२ अ. श्वसनसंस्थेच्या विकारामध्ये श्वसनसंस्थेला बळ मिळण्यासाठी उपयुक्त : जुनाट पडसे (सर्दी), दमा (अस्थमा), क्षयरोग यांसारख्या श्वसनसंस्थेच्या कोणत्याही विकारांमध्ये या औषधाच्या सेवनाने श्वसनसंस्था बळकट होण्यास साहाय्य होते. १५ दिवस ते १ मास सकाळी रिकाम्या पोटी एका गोळीचे चूर्ण थोड्याशा मधात मिसळून चाटून खावे.

२ आ. तीव्र डोकेदुखी : तीव्र डोकेदुखी होत असल्यास ७ दिवस सकाळी रिकाम्या पोटी एका गोळीचे चूर्ण मधातून घ्यावे.

२ इ. अतीसार (जुलाब) : थोडे थोडे; पण पुष्कळ वेळा शौचाला होत असल्यास या औषधाचा उपयोग चांगला होतो. १५ दिवस ते १ मास सकाळी रिकाम्या पोटी एका गोळीचे चूर्ण थोड्याशा मधात मिसळून चाटून खावे.

२ ई. जननेंद्रियांना बळ देण्यास उपयुक्त : शुक्रधातूची क्षीणता (प्रतिदिन झोपेत वीर्यस्राव होऊन थकवा येणे), स्त्रियांच्या योनीमार्गातून श्वेतस्राव होणे यांसारख्या विकारांमध्ये जननेंद्रियांना बळ देण्यासाठी १५ दिवस ते १ मास सकाळी रिकाम्या पोटी एका गोळीचे चूर्ण थोड्याशा मधात मिसळून चाटून खावे.’

औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे काही आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२२)