धार (मध्यप्रदेश) येथे एस्.टी. महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

धार (मध्यप्रदेश) – येथे महाराष्ट्राच्या राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाची बस पुलावरून खाली नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. या वेळी १५ जणांना वाचवण्यात यश आले. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ‘या बसमध्ये ५० ते ६० जण होते’, असे सांगण्यात येत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस पुलाचा कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातग्रस्त बस सकाळी ७.३० वाजता धार येथून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघाली होती.

एस्.टी. अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये अर्थसाहाय्य ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नर्मदा नदीत एस्.टी. महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळाला दिला. या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून ‘बचावकार्य व्यवस्थित पार पाडावे आणि घायाळांवर लगेच उपचारांसाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा’, असे निर्देश जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

प्रशासनाकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित

अपघाताच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी एस्.टी. महामंडळाने ०२२-२३०२३९४० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक चालू केला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष उभारला आहे. त्याचा क्रमांक (०२५७) २२२३१८०आणि (०२५७) २२१७१९३ असा आहे.