शिवसेनेचे कट्टर समर्थक रामदास कदम यांचे पक्ष नेतेपदाचे त्यागपत्र

शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे नेते रामदास कदम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेचे कट्टर समर्थक असणारे नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचे त्यागपत्र दिले आहे. त्याविषयीचे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पत्रात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना ‘तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली’, असे म्हटले आहे.

पत्रात कदम यांनी पुढे म्हटले की,

१. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती; मात्र त्यांच्या निधनानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळाले.

२. मागील ३ वर्षांपासून मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकटे आली, त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

३. वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी युती करण्यापूर्वी मी तुम्हाला रोखले होते; पण तुम्ही माझे ऐकली नाही. याचेही दु:ख माझ्या मनात आहे.

रामदास कदम यांच्याशी चर्चा करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रामदास कदम यांनी त्यागपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘‘मी आता रामदास कदम यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम पहिल्या दिवसापासून आमच्या समवेत आहेत. रामदास कदम यांच्या शुभेच्छा आधीपासूनच आमच्या समवेत होत्या.’’