गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी समर्पण भावाने सेवा केली पाहिजे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कर्नाटकातील विविध क्षेत्रातील जिज्ञासूंसाठी ३ ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग पार पडले !

पू. रमानंद गौडा

मंगळुरू (कर्नाटक) – गुरु शिष्याला साधना सांगून त्याची आध्यात्मिक उन्नती करवून घेऊन त्याला मोक्षप्राप्तीकडे नेतात. त्याचप्रमाणे आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग, ध्यानयोग आणि कर्मयोग या सर्वांचा संगम असलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा मार्ग सर्वांना सांगून सर्वांकडून साधना करवून घेत आहेत. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी आपण स्वतःची क्षमता आणि कौशल्य यांनुसार धर्मकार्यात सहभागी होऊन समर्पण भावाने सेवा केली पाहिजे. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून स्वतःमध्ये ईश्वरी गुण आणण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. ३ ते ५ जुलै या कालावधीत कर्नाटकातील व्यावसायिक, आधुनिक वैद्य, अधिवक्ते, विज्ञापनदाते, वाचक आणि साधना सत्संगातील जिज्ञासू यांच्यासाठी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’च्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी वरील मार्गदर्शन केले. या तिन्ही ऑनलाईन विशेष सत्संगांचा लाभ राज्यातील २ सहस्र ७३० जणांनी घेतला.

या वेळी पू. रमानंद गौडा यांनी ‘गुरूंचे महत्त्व, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, गुरुकुल व्यवस्था, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य, सत्पात्रे दानाचे महत्त्व’, यांविषयी मार्गदर्शन केले.