कर्तृत्ववान शिंजो आबे !

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचे वृत्त भारतासाठीही धक्कादायकच ठरले. शिंजो आबे यांचे भारतासमवेत मित्रत्वाचे नाते होते. हत्येनंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात आले. भारतातही ९ जुलै या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. ६ ऑगस्ट १९४५ या दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणूबाँब टाकला होता. तेव्हा जपानची अपरिमित हानी झाली होती. हिरोशिमा-नागासाकी वरील अणूबाँबचे आक्रमण आणि शिंजो आबे यांची हत्या या दोन्ही घटना जपानसाठी हादरा देणाऱ्याच ठरल्या आहेत. अणूबाँबच्या वेळी भीषण परिणामांमुळे जशी मोठी पोकळी निर्माण झाली, तशा स्वरूपाची पोकळी आता माजी पंतप्रधानांच्या निधनामुळेही निर्माण झाली आहे. अर्थात् जपान याही प्रतिकूल परिस्थितीतून लवकर बाहेर पडेल, यात शंका नाही !

शून्यातून राष्ट्रनिर्मिती !

शिंजो आबे यांनी सर्वाधिक कालावधीसाठी म्हणजे  ९ वर्षांसाठी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांतही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामुळे ‘ते केवळ जपानचे नाही, तर जागतिक स्तरावरील नेते होते’, असे म्हणता येईल. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील ४ प्रमुख देशांना एकत्र करून ‘क्वॉड’ (‘क्वाड्रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग’) या संघटनेची स्थापना करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यामुळे चीनला धडकी भरली होती. ‘क्वॉड’मध्ये चीनचा सहभाग नसल्याने त्याचे शिंजो आबे यांच्याविषयीचे मत कलुषित झाले. याच विद्वेषी मानसिकतेतून त्यांच्या मृत्यूनंतर चीनमधील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. आबे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला चीनच्या लोकांनी ‘हिरो’ म्हट  ले. यावरूनच चीनच्या विकृत मानसिकतेचा प्रत्यय येतो.

जपानला बिकट आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आबे यांनी अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. वर्ष २००६ मध्ये ते जपानचे सर्वांत युवा पंतप्रधान झाले; परंतु त्या काळात कारभारात आलेल्या विविध अडचणी आणि त्यांना असणारा अल्प अनुभव यांमुळे ‘हाऊस ऑफ कौन्सिलर’ या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर शारीरिक त्रासामुळे त्यांनी पदाचे त्यागपत्र  दिले. कालांतराने त्यांनी ‘टेक बॅक जपान’ ही घोषणा दिल्याने मतदारांनी प्रभावित होऊन वर्ष २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत आबे यांच्या ‘लिबरल डेमोक्रॅटिक’ पक्षाला बहुमताने सत्तेवर आणले. वर्ष २०१४ आणि वर्ष २०१७ मधील निवडणुकीतही त्यांना मोठा विजय प्राप्त झाला. कालांतराने पुन्हा प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी वर्ष २०२० मध्ये पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले. आबे यांच्यामुळे देशाला स्थिरता प्राप्त होऊन तो खऱ्या अर्थाने सक्षम झाला.

शिंजो आबे यांची यशस्वी कारकीर्द !

शिंजो आबे हे उजव्या आणि प्रतिगामी विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार, तसेच प्रचार करणारे होते. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर अनेकदा टीका करण्यात आली. ते काही काळ ‘निप्पॉन कायगी’ या अतीउजव्या विचारसरणीच्या संघटनेचे सदस्यही होते. जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी ‘आबेनॉमिक्स’ (Abenomics) म्हणून आक्रमक आर्थिक धोरण अवलंबले. आबे यांच्या नेतृत्वामुळे जपानची अर्थव्यवस्था नुसती सुधारली नाही, तर ती बळकटही झाली. जी-७ देशांच्या अनेक बैठकांमध्ये त्यांनी परखड मते मांडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. चीनच्या विरोधात ते नेहमीच आक्रमक, कणखर आणि रोखठोक होते. अल्प होत चाललेली कामगारशक्तीची अडचण सोडवण्यासह त्यांनी महिलांना कामावर येता यावे, यासाठी अनेक आस्थापनांच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या योजना आणल्या, धोरणे राबवली. त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने खर्चात वाढ केली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जपानी सैन्याला परदेशात लढण्याची अनुमती देण्यासाठी त्यांच्या सरकारने प्रयत्न केले. मित्रदेशांचे रक्षण करण्याचा अधिकार वापरण्यावर असलेली बंदी त्यांनी मागे घेतली. त्यांच्यातील या आणि अशा अनेक स्तरांवरील कृतीशीलतेमुळे ते अल्पावधील लोकप्रिय नेते झाले. एका देशाला कणखर आणि धोरणी नेतृत्व मिळाल्यास त्याचा लाभ त्या देशाला अन् त्याही पुढे जाऊन जगालाही होतो.

भारत आणि शिंजो आबे !

‘उगवत्या सूर्याची भूमी’ म्हणजे जपान ! शिंजो आबे यांच्यामुळे ही भूमी भारताच्या विकासासाठीही लाभदायक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिंजो आबे यांचे जवळचे मित्र ! त्यामुळे त्यांच्यातील घनिष्ठता सर्वांनाच ठाऊक आहे. वर्ष २०२१ मध्ये भारताने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून गौरवले होते. आबे यांना भारतीय संस्कृती, खाद्यपदार्थ, योग, चित्रपट अशा अनेक घटकांचे कौतुक होते. त्यांच्यामुळे भारत आणि जपान यांच्या संबंधांनी वेगळीच उंची गाठली. वर्ष २०१७ मध्ये कर्णावती येथे आबे यांच्या उपस्थितीत झालेली देशातील पहिल्या ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाची पायाभरणी, भारतात चालू करण्यात आलेले मेट्रो प्रकल्प, अणूऊर्जा, सागरी सुरक्षा, प्रशांत टापूतील सहकार्य अशा अनेक सूत्रांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या कार्यकाळात जपानने भारताला ‘अणूशक्ती असलेला देश’ म्हणून स्वीकारले. भारत आणि जपान दोन्ही देशांमध्ये वर्ष २०१६ मध्ये नागरी अणूकरार झाला होता. त्यांच्यामुळे भारत आणि जपान यांच्यातील मित्रत्वाचे नाते अधिक दृढ अन् चिरस्थायी ठरले आहे. महत्त्वाकांक्षी वृत्ती आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून शिंजो आबे जागतिक पटलावर नेहमीच सर्वांच्या स्मरणात रहातील, हे निश्चित !

एखाद्या देशाला कर्तृत्ववान नेतृत्व मिळाल्यास त्याचा लाभ त्या देशाला आणि त्याही पुढे जाऊन जगालाही होतो !