राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘सर्व्हर’मधील फेरफारीच्या प्रकरणी सीबीआयकडून भारतात १८ ठिकाणी धाडी

(‘सर्व्हर’ म्हणजे एक संगणकीय उपकरण अथवा प्रणाली जी अन्य संगणकांना आवश्यक सेवा पुरवते.)

मुंबई – राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘सर्व्हर’मधील फेरफारीच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) भारतात १८ ठिकाणी धाडी टाकल्या. याच प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सध्या चौकशी चालू आहे. यासह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवि नारायण यांच्या विरुद्धही राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अधिकार्‍यांचे भ्रमणभाष ‘टॅप’ (चोरून भ्रमणभाषवरील संभाषण ध्वनीमुद्रण करणे किंवा ते ऐकणे) करणे आणि इतर अनियमितता आढळ्याप्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

१. संजय पांडे हे शासकीय सेवेत नसतांना, म्हणजे वर्ष २००१ मध्ये त्यांनी ‘सॅाफ्टवेअर’शी संबंधित ‘आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि.’ या आस्थापनाची स्थापना केली होती. शासकीय सेवेत रुजू झाल्यावर पांडे यांनी वर्ष २००६ मध्ये या आस्थापनाचे त्यागपत्र दिले.

२. राष्ट्रीय शेअर बाजाराने ‘आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि.’ या आस्थापनाला वर्ष २०१० ते २०१५ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारावर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित लेखापरीक्षण करण्याचे दायित्व सोपवले. तेव्हा ‘सर्व्हर’मध्ये फेरफार होऊनही त्याची कल्पना लेखापरीक्षण आस्थापनाला कशी मिळाली नाही?’ कि ‘त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले?’ असे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातच संजय पांडे यांची सध्या चौकशी चालू आहे.