रिक्शा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारी करण्यासाठीची ‘अ‍ॅप’ सुविधा २ वर्षांपासून बंद !

मुंबई – रिक्शा, टॅक्सी आणि खासगी प्रवासी बस यांच्या चालकांच्या मनमानी कारभाराची तक्रार करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर्.टी.ओ.) ‘अ‍ॅप’ची सुविधा चालू केली होती; मात्र मागील २ वर्षांपासून तांत्रिक त्रुटीमुळे ती बंद आहे.

जास्त भाडे घेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसमवेत विनाकारण हुज्जत घालणे, असे प्रकार रिक्शा आणि टॅक्सी वाहनचालकांकडून होतात. त्यामुळे तक्रारी करण्यासाठी प्रवासी प्रथम वाहतूक पोलिसांच्या ‘हेल्पलाईन’वर संपर्क साधतात; मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तशी सुविधा नाही. प्रवाशांना परिवहन विभागाच्या ई-मेलवर तक्रार करावी लागते; पण त्यांचे योग्य पद्धतीने निराकरण होत नाही. त्यामुळे परिवहन विभागाने वर्ष २०१७ मध्ये भ्रमणभाष अ‍ॅपची सुविधा चालू केली. ‘ॲप’मध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या असून त्या सोडवण्याचे काम चालू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही तांत्रिक त्रुटीमुळे ‘ॲप’ २ वर्षे बंद असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?