समाजाच्या सर्व वर्गांपर्यंत पोचण्यासाठी भाजप ‘स्नेह’यात्रा काढणार !

पंतप्रधानांनी हैद्राबादला संबोधले ‘भाग्यनगर’ !

भाग्यनगर येथे ‘विजय संकल्प सभा’

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक ‘विजय संकल्प सभे’च्या रूपाने येथे ३ जुलै या दिवशी पार पडली. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आम्ही विरोधात होतो, तेव्हा ‘संघर्ष यात्रा’ काढत होतो. संघर्ष आमच्या वृत्तीत आहे. लोकांना आमच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे.’’ समाजाच्या सर्व वर्गांपर्यंत पोचण्यासाठी आता ‘स्नेह यात्रा’ काढावी, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी हैद्राबादच्या ऐवजी भाग्यनगरचा नामोल्लेख करत म्हटले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची हाक दिली होती. आमचा एकच कार्यक्रम आहे, तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे.

पंतप्रधानांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ संकल्प वास्तवात येण्यासाठी मुसलमान समाजातील बहुसंख्य वर्गास विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आवश्यक आहे.

पुढील ३०-४० वर्षे भाजपचे युग ! – गृहमंत्री शहा

त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, येत्या ३०-४० वर्षांपर्यंत भाजप युग राहील आणि भारत विश्वगुरु बनेल.