मुंबई, २९ जून (वार्ता.) – शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर चारही बाजूंनी संकटाने घेरलेल्या महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का बसला. ३० जूनला जवळपास ३ घंटे दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाल्यानंतर सकाळी ११ वाजता विधीमंडळात घेण्यात येणारी बहुमत चाचणी रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार देऊन महाविकास आघाडीची याचिका फेटाळली. त्यामुळे ३० जूनला विश्वासदर्शक चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार होते; परंतु २९ जूनच्या रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र दिल्याने महाविकास आघाडीला नामुष्कीला सामोरे जावे लागणार नाही.
न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार बहुमत सिद्ध करणार कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरकारच्या विरोधात हा निर्णय गेल्याने परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याखेरीज पर्याय राहिला नव्हता.