अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान्यांकडून जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १ सहस्र ५११ महिलांवर अत्याचार !

१४३ महिलांच्या हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबान्यांकडून जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १ सहस्र ५११ महिलांवर अत्याचार करण्यात आले असून १४३ महिलांची हत्या करण्यात आली आहे. अशा अत्याचारांपासून जीव वाचवण्यासाठी गेल्या मासातच अफगाणिस्तानातून महिला आणि मुले यांच्यासह २ सहस्र ५०० लोक अवैधरित्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पळून गेले आहेत.

‘तालिबान्यांनी लैंगिक शोषण करण्याआधीच मारून टाकावे’, अशी प्रार्थना केली ! – पीडित महिला पत्रकार

या लोकांच्या गटांमध्ये आधुनिक वैद्य (डॉक्टर्स), शिक्षक, माजी सैनिक, पोलीस कर्मचार्‍यांपासून ते मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारही आहेत. यांच्यापैकी अफगाण सैन्यात सेवा बजावलेल्या व्यक्तीची ४० वर्षीय पत्नी म्हणाली, ‘मी महिला अधिकार कार्यकर्ती होते आणि ३० वर्षीय बहिणीसमवेत तालिबानच्या विरोधात वृत्त प्रसारित करत होते. काही मासांपूर्वी तालिबानी सैनिक आमच्या मजार-ए-शरीफ शहरातील घरात घुसले. त्यांनी मी, माझी बहीण आणि शेजारच्या घरातील ६ महिला यांना उचलून नेले. ‘तालिबान्यांनी लैंगिक शोषण करण्याआधीच मारून टाकावे’, अशी प्रार्थना मी करत होते.’

ती महिला पुढे म्हणाली की, माझे, माझ्या बहिणीचे आणि अन्य ६ महिलांचे लैंगिक शोषण करत तालिबानी सैनिकांनी आम्हाला १० दिवस कैदेत ठेवले अन् सामूहिक अत्याचार केला. ज्या महिला सामूहिक अत्याचारांनंतर वाचल्या, त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी ठार मारले. यासह त्यांनी त्या रात्री अपहरण केलेल्या ३० पुरुषांपैकी ८ पुरुषांना अमानुषपणे मारून टाकले आणि इतरांना कारागृहात डांबले.

सीमेबाहेर जाण्यासाठी द्यावी लागते एक लाखाची लाच !

काबूलमध्ये ब्रिटिश दूतावासातील माजी व्हिसा अधिकारी फरहद अफगाणी म्हणाले की, देशातून बाहेर जाणार्‍या लोकांना संबंधित अधिकार्‍यांना एक लाखापर्यंत लाच द्यावी लागते.

अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली !

राजकीय तज्ञ सांगतात, ‘तालिबाच्या राजवटीत महिलांना कठोर शिक्षा दिली जाणार नाही’, असे वचन तालिबानने दिले होते. तरीही त्यांची शैली वर्ष १९९६ ते २००१ मधील ‘तालिबान’सारखीच क्रूर आहे. १३ ते १८ वर्षे वयाच्या मुलींच्या बहुतांश माध्यमिक शाळा बंद आहेत. बहुतांश महिलांना सरकारी नोकर्‍यांतून काढण्यात आले आहे. २७ वर्षीय शिक्षिका फतमेह म्हणाल्या, ‘‘अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.’’

संपादकीय भूमिका

याविषयी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना गप्प का बसते ?