वर्ष २०२१ मध्ये जगभरातील १० कोटींपेक्षा अधिक लोक विस्थापित – संयुक्त राष्ट्रे

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या ‘रिफ्युजी एजन्सी’च्या वार्षिक अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, हवामान पालट आणि विविध आपत्ती यांमुळे वर्ष २०२१ मध्ये जगभरातील १० कोटींहून अधिक लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विस्थापित झाले आहेत. भारतात ही संख्या अनुमाने ५० लाख आहे. एवढ्या मोठ्या विस्थापनाची कारणे हिंसा, मानवी हक्कांचे उल्लंघन, अन्न असुरक्षितता, हवामान संकट, युक्रेनमधील युद्ध आणि इतर आपत्कालीन परिस्थिती ही आहेत.

या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये ६० लाख, तर फिलिपिन्समध्ये ५७ लाख लोक विस्थापित झाले. गेल्या १० वर्षांत घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.