दोन धर्मांतील युवक-युवती यांनी केलेल्या विवाहाच्या विरोधात धार्मिक स्थळावर आक्रमण

सोनिपत (हरियाणा) – येथील फरमाणा गावात एका धर्माच्या युवकाने दुसर्‍या धर्माच्या युवतीशी न्यायालयात जाऊन विवाह केला. यामुळे संतापलेल्या काही अज्ञातांनी गावातील एका धार्मिक स्थळावर आक्रमण करून तेथे नासधूस केली, तसेच मुलाचे घर जाळण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक मयंक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलीस गावात पोचले आणि दोन्ही पक्षांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात धार्मिक स्थळाची हानी केल्याचा गुन्हाही प्रविष्ट केला.

गेल्या मासात संबंधित युवतीच्या वडिलांनी दुसर्‍या धर्माच्या युवकावर त्यांची मुलगी पळवून नेल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. युवक आधीपासून विवाहित असून तो चार मुलांचा पिता आहे, असा युवतीच्या वडिलांनी आरोप केला. यानंतर दोघांनी न्यायालयात जाऊन विवाह केला.