म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडातील दोषींना शिक्षा होण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल ! – आमदार मनीषा कायंदे, शिवसेना

डॉ. मनीषा कायंदे

सांगली, ५ जून (वार्ता.) – महिला अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात विशाखा समिती स्थापन करण्याचे निर्देश आहेत. त्याचा आढावा समितीने घेतला आहे. सांगली जिल्ह्यात याची प्रभावीपणे कार्यवाही होत आहे. म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडाविषयी सर्व माहिती घेतली असून दोषींना शिक्षा होण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी दिली. मनीषा कायंदे यांच्यासह आमदारांची समिती सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, सुनीता मोरे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘महिला आणि बालकल्याण विभागाकडून देण्यात येणार्‍या योजना तळागाळापर्यंत पोचत आहेत. कोरोना काळातील विधवा झालेल्या बहुतांश महिलांना अनुदानही पोचले आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेनेची महिला आघाडी सक्षमपणे कार्यरत असून, शिवसेनेचे प्रत्येक काम तळागाळापर्यंत पोचवले जात आहे’, असेही त्यांनी सांगितले.