ठाणे, १ जून (वार्ता.) – अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी (वय ६० वर्षे) यांचे १ जून या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात मागील २ दिवसांपासून उपचार चालू होते.
कल्याण (पश्चिम) येथे रहाणारे प्रमोद जोशी हे प्रारंभीपासून श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सक्रीय सहभागी होते. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आंदोलन आणि श्रीराम मंदिराची निर्मिती यांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. श्रीराम जन्मभूमीच्या विषयाअंतर्गत पुरातत्व विभाग आणि त्याच्याशी संबंधित कायदेशीर गोष्टी यांविषयी त्यांचा सखोल अभ्यास होता. श्री काशी विश्वनाथ मंदिर हाही त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.
प्रमोद जोशी हे हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक होते. समितीने मुंबईतील आझाद मैदान येथे केलेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. ‘सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटितपणे कार्य करायला हवे’, अशी त्यांची मनीषा होती. सनातन संस्था जोशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कृतीशील अनुयायी असलेला हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्यातेएक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यासाठी वेळ दिला. स्वतः बुद्धी आणि श्रम अर्पण केले. अनेक आंदोलनांत सहभागी होऊन त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले. ते सावरकरांचा कृतीशील अनुयायी होते. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! |