शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी केवळ ४ ओळी, तर मोगलांवर पूर्ण पुस्तक ! – अभिनेते अक्षय कुमार

अक्षय कुमार

मुंबई – इयत्ता ८ वीच्या पुस्तकामध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान आणि आमच्या हिंदु राजांविषयी केवळ ४ ओळी आहेत; मात्र मोगल साम्राज्याच्या इतिहासावर पूर्ण पुस्तक भरले आहे. आपल्याला याकडे धर्माच्या नाही, तर संस्कृतीच्या दृष्टीने पहायला हवे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास गंगानदीपासून सोमनाथ मंदिरापर्यंतचा आहे. त्यानंतर तो देहलीपर्यंत पोचतो, असे विधान अभिनेते अक्षय कुमार यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. अक्षय कुमार यांची भूमिका असणारा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट येत्या ३ जून या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी हेही उपस्थित होते. डॉ. द्विवेदी यांनी प्रसिद्ध ‘चाणक्य’ या दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत आर्य चाणक्यांची भूमिका साकारली होती.

या वेळी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितले की,

१. वर्ष १९४७ मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा देशाला निर्णय घ्यायचा होता की, ती कोणती चेतना आहे, ज्याद्वारे देशाचे भविष्य ठरवण्यात येणार होते ? मला आठवते की, फ्रान्समधील एका विद्वानाने विचारले होते, ‘भारतीय आदिगुरु शंकराचार्यांच्या ‘अद्वैत’ अथवा ‘वेदांत’ यांच्या मार्गावर चालणार आहोत का ?’ त्या वेळी देशावर जे राज्य करत होते, त्यांच्या डोक्यात ही गोष्टच नव्हती. त्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशामधील लोकांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्यात आली.

२. आमचा इतिहास वैदिक काळापासून चालू होतो; मात्र जेव्हा इतिहासाचे लेखन पहातो, तेव्हा चंद्रगुप्त मौर्यापासून इतिहास चालू होतो आणि तो केवळ एका परिच्छेदापुरताच रहतो. जेव्हा इतिहासाची गोष्ट करतो, तेव्हा त्यात स्थापत्य, कला आदी सर्व गोष्टी येतात; मात्र ज्यांनी इतिहास लिहिला, त्यांनी या सर्वच गोष्टी लपवल्या.

३. आता इतिहासाचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे; कारण देशात नवीन सरकार आहे. आपणही आपला इतिहास नीट जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आता काही चित्रपट निर्माते तो प्रयत्न करत आहेत.

४. मी जेव्हा सम्राट पृथ्वीराज चित्रपट बनवण्यास सिद्ध झालो, तेव्हा हाच खरा इतिहास सांगण्याचा उद्देश ठेवून निर्मात्यांना होकार दिला होता.

संपादकीय भूमिका

अक्षय कुमार यांची भूमिका असणारा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट प्रदर्शित होत असल्याने ते आता असे बोलू लागले आहेत. इतकी वर्षे त्यांना हे ठाऊक नव्हते का ? त्यांच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांतून हिंदु धर्माविषयी अयोग्य चित्रण होते, तेव्हा ते का गप्प राहिले ?