जुन्या दगडी पुलावरील खड्ड्यांविषयी महर्षि वाल्मीकि संघाकडून शासनाला साडी-चोळीचा अहेर !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २६ मे (वार्ता.) – येथील ऐतिहासिक जुन्या दगडी पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी महर्षि वाल्मीकि संघाकडून शासनाला साडी चोळीचा आहेर देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पुलावरून सहस्रो भाविक वारीमध्ये ६५ एकर ते पंढरपूर ये-जा करतात. या पुलावर भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्न या वेळी महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी शासनाला विचारला. या वेळी पुलावरील खड्ड्याला साडी-चोळी घालून झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी, तसेच रस्ता दुरुस्ती करून नवीन करण्यात यावा, यांसाठी हे आंदोलन करण्यात आले, असे गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, रणजित भोसले, सोमनाथ खेडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

‘खड्ड्यांविषयी असंवेदनशील असलेले प्रशासन काय कामाचे ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? संघटनांनी प्रशासनाला जाग येईपर्यंत पाठपुरावा चालू ठेवावा.