आसाममध्ये पोलिसांच्या कह्यात असलेल्या मुसलमानाचा मृत्यू झाल्याने जमावाने पोलीस ठाणे जाळले !

जाळपोळ करणाऱ्यांपैकी ५ जणांची अवैध घरे प्रशासनाने पाडली

नगाव (आसाम) – येथे पोलिसांनी अटक केलेल्या सफीकुल इस्लाम या व्यक्तीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर मुसलमानांच्या जमावाने येथील बटाद्रवा पोलीस ठाण्यात तोडफोड करून त्याला आग लावली. यात पोलीस ठाणे पूर्णपणे भस्मसात झाले, तसेच काही वाहनेही जळाली. या आक्रमणात २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. पोलिसांनी या हिंसाचाराच्या प्रकरणी ३ जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे प्रशासनाने या हिंसाचारात सहभागी असलेल्या ५ आरोपींच्या अवैध घरांवर कारवाई करून ती पाडली.

१. राज्याचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योति महंत यांनी म्हटले की, सफीकुल इस्लाम याच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे.

२. मासे विक्री करणारा सफीकुल इस्लाम हा मद्य पिऊन रस्त्यावर पडलेला असतांना पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले होते. तेव्हा त्याचा तेथे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुसलमानांचा आरोप आहे की, पोलिसांनी सफीकुल इस्लाम याची सुटका करण्यासाठी त्याच्याकडे १० सहस्र रुपयांची लाच मागितली. ती देण्यास त्याने असमर्थता व्यक्त केल्यावर पोलिसांनी त्याची हत्या केली.

संपादकीय भूमिका

पोलीस कोठडीत एखाद्याचा संशयास्पद मृत्यू होण, हे चुकीचेच; मात्र त्यासाठी कायदा हातात घेऊन पोलीस ठाणे पेटवून देण्याच्या मुसलमान जमावाच्या उद्दाम वृत्तीचे समर्थन केले जाऊ शकत नाही. समाजात शांतता नांदण्यासाठी ही मनोवृत्ती घातक असल्यामुळे त्याच्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !