(म्हणे) ‘यात्रेकरू काश्मीरच्या प्रश्‍नात सहभागी होणार नाहीत, तोपर्यंत यात्रा सुरक्षित !’

अमरनाथ यात्रेपूर्वी जिहादी आतंकवादी संघटनेकडून धमकीचे पत्र

श्रीनगर -(जम्मू-काश्मीर) – येत्या ३० जूनपासून अमरनाथ यात्रेस आरंभ होत असून ११ ऑगस्टला ती संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ जिहादी आतंकवादी संघटनेने धमकीचे पत्र प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे की, आम्ही यात्रेच्या विरोधात नाही; पण यात्रेकरू तोपर्यंत सुरक्षित आहेत, जोपर्यंत ते काश्मीर प्रश्‍नात सहभागी होत नाहीत. ते (सरकार) अमरनाथ यात्रेचा वापर त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी करणार आहेत. केवळ १५ सहस्र ते ८ लाख यात्रेकरूंची नोंदणी आणि १५ ते ८० दिवसांपर्यंतचा कालावधी केवळ काश्मीरच्या परिस्थितीची संवेदनशीलता भडकवण्यासाठी आहे. ही फॅसिस्ट (हुकूमशाही) राजवट अमरनाथ यात्रेच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खोर्‍यात आणत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.

४३ दिवस चालणार्‍या अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंची संख्या पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. या वेळी रामबन आणि चंदनवाडीत मोठ्या छावण्या असतील. या पार्श्‍वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

काश्मीरच्या संदर्भात  यात्रेकरूंनी काय करावे आणि काय करू नये, हे ठरवणारे आतंकवादी कोण ? काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक हिंदूला त्यावर बोलण्याचा अधिकार आहे !