सोलापूर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर – शहरात १९ मे या दिवशी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाची ३६.१ मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत ठराविक कालावधीसाठी मेघगर्जनेसह पाऊस पडला. शहरातील अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी थांबले होते. पाण्याचा निचरा होण्यास अधिक वेळ लागत असल्याने नागरिक आणि वाहनधारक यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता. पंढरपूर तालुक्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने डाळींब, केळी, द्राक्षे यांसह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

होटगी रस्त्यावर महावीर चौक, इदगाह मैदानाजवळील पूल, चेतन फौंड्रीजवळ पाणी साचले होते, तर अशोक चौक ते गुरुनानक चौक मार्गावरील खड्डे पाण्याने भरल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. शहरात गॅसलाईन आणि ‘महानेट’साठी रस्ते खोदले आहेत; मात्र ते पूर्ववत् करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेला मातीचा ढिगारा, रस्त्यावर दलदल निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. (पहिल्या पावसातच शहरवासियांना कसरत करावी लागली, हे दुर्दैवी. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची यंत्रणा सक्षम करणे आवश्यक होते. – संपादक)