पाणीचोरीच्या विरोधात संभाजीनगर महापालिकेची विशेष मोहीम !
संभाजीनगर – शहरातील अनधिकृत नळांचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने १ खास पथक तैनात केले आहे. हे पथक शहरातील विविध भागांतील वसाहतींची पहाणी करत आहे. शहरातील पहाडसिंगपुरा रस्त्यावरील ४०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवर किमान १ सहस्र २०० अनधिकृत नळ पाहून महापालिकेचे अधिकारी थक्क झाले. याच भागातून पाणी न मिळण्याच्या तक्रारी अधिक होत्या. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन अशा प्रकारच्या अनधिकृत नळांची कापणी करण्याची मोहीम लवकरच महापालिकेच्या वतीने चालू केली जाणार आहे.
शहरात एकूण १ लाख २९ सहस्र घरगुती ग्राहक असून व्यावसायिक ६ सहस्र, असे एकूण १ लाख ३५ सहस्र ग्राहक आहेत. तरीही १ लाखांहून अधिक अनधिकृत नळ असावेत, असा महापालिकेचा प्राथमिक अंदाज आहे. हा आकडाही अपेक्षेपेक्षा अधिक असू शकतो. शहरातील मालमत्तांची संख्या जवळपास ४ लाख एवढी आहे. यापैकी १० टक्के नागरिकांच्या वसाहतीत जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. उर्वरित नागरिकांकडे नळ असतील, असे महापालिकेला वाटते.
संपादकीय भूमिकाशहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी कशी काय होते ? अशाप्रकारची जोडणी महापालिकेतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या संमतीविना होऊ शकते का ? नेमके पाणी कुठे मुरते, हे शोधून संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. |