मल्याळ्ळी अभिनेत्री सुहाना यांचा संशयास्पद मृत्यू !

सुहाना

बेंगळुरू (कर्नाटक) – मल्याळ्ळी अभिनेत्री सुहाना १२ मे या त्यांच्या २२ व्या जन्मदिनाच्या रात्री कोळिकोडे येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. पतीनेच त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून पतीकडून त्यांचा छळ होत असल्याचा दावा केला आहे. पोलीस या मृत्यूचा तपास करीत असून त्यांचा पती सज्जात यांना ताब्यात घेण्यात आले आहे. साधारण दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

सुहाना यांच्या आईने स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की, माझी मुलगी कधीही आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्या करण्यात आली आहे. ती माझ्याकडे तक्रार करायची की, तिचा पती तिला मारझोड करतो, तसेच पुरेसे खायलाही देत नाही. सज्जात हा पूर्वी कतारमध्ये नोकरीस होता. सध्या तो बेरोजगार आहे.

सज्जात यांनी दावा केला आहे की, त्यांची पत्नी त्यांना स्नानगृहात मृतावस्थेत आढळली.