पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट लाँचरद्वारे ग्रेनेडचे आक्रमण !

चंडीगड – पंजाबमधील मोहाली येथे असणार्‍या पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’द्वारे आक्रमण करण्यात आले; मात्र ग्रेनेड न फुटल्याने केवळ खिडक्यांच्या काचांचीच हानी झाली. या आक्रमणाचे अन्वेषण करण्यात येत आहे. हे आतंकवादी आक्रमण असल्याचे म्हटले जात आहे. ८० मीटर अंतरावरून हे आक्रमण करण्यात आले. आक्रमकांची चारचाकी गाडी येथून जातांना पोलिसांना दिसून आली होती. यातूनच आक्रमण करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या गाडीत २ जण असल्याचे म्हटले जात आहे.

‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’ म्हणजे काय ?

रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आर्पीजी) कोणतीही टाकी, चिलखती वाहन, हेलिकॉप्टर किंवा विमान यांना उद्ध्वस्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याची श्रेणी ७०० मीटर आहे. खांद्यावरून रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड डागला जातो. हे एक क्षेपणास्त्र आहे जे स्फोटकाने सुसज्ज रॉकेट लाँच करते. बहुतेक आर्पीजी एका व्यक्तीद्वारे वाहून नेले जाऊ शकतात. म्हणजेच एक व्यक्ती ते एकट्याने हाताळू शकतो. अफगाणिस्तानमधील तालिबानविरोधातील युद्धात याचा वापर करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये खलिस्तान्यांचा वाढता प्रभाव पहाता ही एक गंभीर घटना आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून खलिस्तान्यांची वळवळ चिरडण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !