‘तुम्ही तृणमूल काँग्रेसचे दलाल असून आम्ही तुमच्यावर थुंकतो !’

काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांकडून काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचा विरोध

कोलकाता (बंगाल) – ‘तुम्ही तृणमूल काँग्रेसचे दलाल झाला आहात. आम्ही तुमच्यावर थुंकतो’, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांचा काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांनी विरोध केला. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयद्वारे केले जावा, अशी त्यांनी याचिकेद्वारे मागणी केली आहे. या याचिकेला विरोध करण्यासाठी चिदंबरम् हे न्यायालयात आले होते. त्यामुळे काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांनी त्यांना विरोध केला.

बंगालमधील ‘मेट्रो डेअरी’ आस्थापनाचे ४७ टक्के शेअर्स ‘केवेंटर्स अ‍ॅग्रो लिमिटेड’ या आस्थापनाला विकण्यात आले होते. या आस्थापनेचे हे शेअर खरेदी केल्यानंतर १५ टक्के शेअर्स सिंगापूरमधील एका आस्थापनेला हस्तांतरित केले होते. ‘वर्ष २०११ पासून ममता बॅनर्जी सरकारने केलेली ही एकमेव निर्गुंतवणूक होती’, असे खासदार चौधरी यांचे म्हणणे आहे. पी.चिदंबरम् यांनी या खटल्यात केवेंटर्स अ‍ॅग्रो लिमिटेडचे वकीलपत्र घेतले आहे. त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात चौधरी यांनी प्रविष्ट केलेली याचिका रहित करावी, अशी मागणी केली. ही मागणी ऐकल्याने संतापलेल्या काँग्रेस समर्थक अधिवक्त्यांनी त्यांना न्यायालयाबाहेर पडतांना कडाडून विरोध केला. या प्रकाराविषयी खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, जर चिदंबरम् यांच्यासारखे नेते हा खटला लढणार असतील, तर मी काय बोलू शकतो ? हा एक मोठा घोटाळा असल्याने मी या प्रकरणात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.