मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करण्यासारखी परिस्थिती नाही ! – खासदार संजय राऊत

मुंबई – आजही आमचा श्‍वास बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो. मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करावे, अशी परिस्थिती नाही. सर्वांनी अनुमती घेतली असल्याने कारवाईची आवश्यकता नाही. हाच नियम मंदिर, चर्च आदी सर्वांना लागू आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे या दिवशी सकाळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली. ‘बाळासाहेबांनी कधीच म्हटले नाही की, मंदिरावरील भोंगे बंद करा’, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले,

‘‘राज्यात शांतता असून कोणतेही आंदोलन झालेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि नमाज यांच्याविषयी भूमिका घेतली होती. सत्ता आल्यावर त्यांनी नमाज बंद केले. रस्त्यावरील नमाजावर तोडगा काढल्यावर तेही बंद झाले. भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर भोंगे बंद झाले.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब समजावून घ्यावेत.’’