अधिकार नसलेल्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन काय लाभ ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्यात भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात चालला आहे. भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. विरोधी पक्षाला संपवण्याचे काम चालू आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलतो; म्हणून भाजपच्या नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशी स्थिती असतांना त्यावर कारवाई न करणाऱ्या आणि अधिकार नसलेल्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन काय लाभ ? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही उपस्थित होते.

राज्यातील भोंग्याच्या प्रश्नाविषयी गृहमंत्री दिलीप कोळसे पाटील यांनी २५ एप्रिल या दिवशी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला. याविषयीची भूमिका फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडली. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘गृहमंत्री कोणताही निर्णय घेत नाहीत आणि मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित नाहीत. अशा बैठकीला जाऊन काय उपयोग ? राणा दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या निवासनाच्या बाहेर हनुमान चालिसा म्हणणार होते. कोणता अपप्रकार तर करणार नव्हते ना ? कुणाला हे अयोग्य वाटूही शकते; मात्र सत्तारूढ पक्षाने एका स्त्रीसाठी इतका जमाव जमवणे योग्य नाही. हनुमान चालिसा महाराष्ट्रातच नव्हे, तर काय पाकिस्तानमध्ये म्हणायची का ? नवनीत राणा यांना कारागृहात हीन प्रकारची वागणूक देण्यात येत आहे. याविषयी त्यांच्या अधिवक्त्याद्वारे त्यांनी केंद्रशासनाकडे तक्रार केली आहे. अशा सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याविना पर्याय नाही.’’

हिंदूंप्रमाणे सर्व समाजानेही सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला पाहिजे !

यापूर्वी नवरात्रीमध्ये विलंबापर्यंत देवीची उपासना आणि गरबा खेळला जायचा, गणेशोत्सवात भजने व्हायची; मात्र सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूंनी तक्रार न करता स्वीकारला. १०० वर्षांची परंपरा असलेल्या पुणे येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत देशी वाद्ये वाजवण्याचा नियम हिंदूंनी मान्य केला. हिंदू समाजाने हा आदेश मान्य केला, तर सर्व समाजानेही हे मान्य केले पाहिजे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.