ढोल, ताशे, लेझीम, टाळ, वारकरी आदी पथकांनी लोकांचे लक्ष वेधले !
उद्गीर (जिल्हा लातूर), २२ एप्रिल (वार्ता.) – ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. दिंडीमध्ये इतिहासकालीन गीतांसह मराठी भाषेचा गौरव आणि भारतीय संस्कृती यांचे दर्शन घडवणारी विविध पथके सहभागी झाली होती. उद्गीर तालुक्यातील शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
ग्रंथपालखीमध्ये ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज यांचे ग्रंथ, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके आदींचा समावेश होता. दिंडीमध्ये ढोल, ताशे, लेझीम, टाळ आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी नृत्य केले. दिंडीमध्ये डॉक्टर आणि परिचारक यांचे स्वतंत्र विद्यार्थी पथक, टाळ-मृदंगासह वारकर्यांचे पथक, घोड्यावर बसलेली झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत भगवे ध्वजधारी विद्यार्थी, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे देखावे, हे विशेष आकर्षक ठरले.
नागरिकांचे अयोग्य वर्तन !
काही नागरिकांनी दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांना पाण्याची व्यवस्था केली होती; मात्र लोक रस्त्यावरच पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक पिशव्या आणि रिकाम्या बाटल्या टाकत होते. हा कचरा उचलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विशेष पथकाची व्यवस्था करण्यात आली होती.