संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार !

पायी वारीचा सोहळा जाहीर

संत ज्ञानेश्वर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या संसर्गानंतर यंदाच्या वर्षी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर येथे भरणार आहे. लाखो वारकऱ्यांसमवेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २१ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या वर्षी तिथीच्या वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटण (जिल्हा सातारा) येथे २ दिवस पालखी सोहळा मुक्कामी रहाणार आहे. दिंडीकरांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या स्वाक्षरी-शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अधिवक्ता विकास ढगे पाटील यांनी दिली.

येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वाढ झाली आहे. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या स्वाक्षरी आणि शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशीही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अधिवक्ता विकास ढगे पाटील यांनी दिली आहे. या बैठकीस दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुति कोकाटे, व्यवस्थापक माऊली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडीप्रमुख आणि फडकरी उपस्थित होते.