भोर (जिल्हा पुणे) येथील श्रीरामनवमी जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

राजे श्री. राजेश पंतसचिव यांना सनातनचा ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’ हा ग्रंथ भेट देतांना श्री. विश्वजित चव्हाण

भोर (जिल्हा पुणे) – गेली ३२५ वर्षांची परंपरा असलेला भोर येथील श्रीरामनवमी जन्मोत्सव १० एप्रिल या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भोर संस्थानचे राजे श्री. राजेश पंतसचिव, त्यांचे कुटुंबीय आणि भोर ग्रामस्थ, रामभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी राजवाड्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला होता. प्रतिवर्षी अनेक जिज्ञासू याचा लाभ घेतात. राजे श्री. राजेश पंतसचिव यांच्या अनुमतीने राजवाड्यात ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्याचे यंदाचे विसावे वर्ष आहे. सर्व स्तरांतून याला उत्तम प्रतिसाद मिळाला. रामनवमीच्या दिवशी राजे श्री. राजेश पंतसचिव यांची सनातनचे साधक श्री. विश्वजित चव्हाण आणि श्री. शशांक मुळे यांनी सदिच्छा भेट घेतली अन् त्यांनी केलेल्या सहकार्याविषयी त्यांचे आभार मानले. या वेळी त्यांना सनातनचा ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’ हा ग्रंथ भेट दिला.

भोर राजवाड्यातील रामनवमी वितरण कक्ष

या वेळी सनातनच्या साधकांकडून राजे श्री. पंतसचिव यांनी सनातन संस्थेचे कार्य, सध्या चालू असणारे उपक्रम यांविषयी जाणून घेतले आणि त्यांनी स्वतःचेही अनुभव सांगितले. ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’विषयी सांगितल्यावर त्यांनी ते तत्परतेने भ्रमणभाषमध्ये ‘डाऊनलोड’ करण्याची सिद्धता दर्शवली. ‘भविष्यात रामनाथी, गोवा येथील आश्रमास अवश्य भेट देऊ’, असे त्यांनी सांगितले.