वारीच्या नियोजनाच्या संदर्भात प्रशासनाची ढिलाई
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या चैत्री यात्रेसाठी पंढरपूर येथे २ लाख भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. नवीन वर्षातील पहिली यात्रा आणि वारकरी संप्रदायातील चार महत्त्वाच्या वारींपैकी एक असलेली चैत्र वारी, अशा महत्त्वाच्या वारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक प्रतिवर्षी येतात. यंदा कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्याने भाविकांमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाविषयी मोठा उत्साह दिसून आला. टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा जयजयकार यांमुळे पंढरपूरनगरी दुमदुमून निघाली होती.
यंदा भाविकांचा मोठा उत्साह होता; मात्र वारीच्या नियोजनाच्या संदर्भात प्रशासनाचा ढिसाळपणा दिसून आला. येथील ६५ एकर क्षेत्रामध्ये भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी होती, तर शहरातील चौकाचौकांत बसवण्यात असलेले ‘वॉटर टँक’ बंद अवस्थेत आहेत. चंद्रभागा नदीमध्येही प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले नव्हते. भाविकांनी मागणी केल्यानंतर पाणी सोडण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने शहरामध्ये गर्दी होते, त्यादृष्टीने प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते. (उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न का केले नाहीत ? कोरोनाच्या संसर्गाच्या कालावधीत एकाही भाविकाला शहरात प्रवेश करू न देणारे प्रशासन संसर्ग न्यून झाल्यानंतर वारीच्या उत्सवाचे नियोजन करण्यास ढिसाळपणा करते, हे लक्षात घ्या ! – संपादक)