तुमच्या सरकारला सांगा, ‘आमचा कोहिनूर हिरा परत करा !’

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे ब्रिटीश निवेदकाला (‘कमेंटेटर’ला) आवाहन !

हिंदु संस्कृतीचा गौरव राहिलेल्या कोहिनूर हिर्‍यासंबंधी महत्त्वपूर्ण विधान करणारे सुनील गावस्कर यांचे अभिनंदन ! आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी कोहिनूर परत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद ! – संपादक

मुंबई – भारताच्या विविध राजघराण्यांचा ‘गौरव’ राहिलेला कोहिनूर हिरा सध्या ब्रिटीश राजघराण्याकडे आहे. अनेकांकडून तो परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु त्यांस यश आले नाही. सध्या ‘इंडियन प्रीमियर लीग’ ही क्रिकेट स्पर्धा चालू असून त्यात या हिर्‍याचा उल्लेख केला गेला. निवेदक (कमेंटेटर) आणि जगप्रसिद्ध माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ब्रिटनचे सहनिवेदक अ‍ॅलन विल्किन्स यांना उद्देशून म्हटले, ‘आम्ही ‘कोहिनूर हिर्‍या’च्या प्रतीक्षेत आहोत. जर तुमची ब्रिटीश सरकारमध्ये ओळख असेल, तर त्यांना सांगा की, ‘आमचा कोहिनूर हिरा परत करा !’

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये चालू असलेल्या एका सामन्याच्या वेळी ‘मरीन ड्राईव्ह’चे छायाचित्र दाखवल्यावर गावस्कर यांनी वरील विधान केले. मरीन ड्राईव्हला ‘क्वीन्स नेकलेस’ (राणीचा हार) ही म्हटले जाते; कारण रात्रीच्या दिव्यांमधील त्याचा प्रकाश एका हिर्‍यासारखे दिसतो.