कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – विशाळगडावरील गडाची ग्रामदेवता असलेल्या वाघजाईदेवीच्या मंदिराच्या जिर्णाेद्धाराचे काम ‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’ कोल्हापूर प्रांताच्या वतीने श्रीरामनवमी म्हणजेच १० एप्रिल या दिवशी लोकवर्गणीतून पूर्णत्वास नेले गेले. या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर, कार्यप्रमुख श्री. रोहित देसाई, सर्वश्री योगेश केरकर, मंजुनाथ स्वामी, आशुतोष तांबेकर, सचिन पाटील, संजीवनी देसाई, पियुष देसाई, देवकर, पोतदार, चिले, करंबे यांसह शेकडो शिवप्रेमी यात सहभागी झाले होते.
असा झाला नेत्रदीपक सोहळा
१. प्रारंभी किल्ल्यावर जाणार्या मूळ शिवकालीन राजमार्गाच्या प्रारंभी माहिती देणारी आणि प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आलेल्या मुख्य कमानीचे अन् देवीच्या पालखीचे पूजन जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष अरुण मोरेगुरुजी आणि पुणे येथील इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य श्री. बालाजी काशीद यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
२. मावळ्यांच्या वेशातील धारकर्यांनी पालखी खांद्यावर घेऊन जयघोष करत वाटेत पालखीवर पुष्पवृष्टी करत गडावरील देवतांच्या भेटी घेत पालखी वाघजाईदेवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. येथे ह.भ.प. मोरेगुरुजी आणि श्री. बालाजी काशीद यांचे मार्गदर्शन झाले.
३. यानंतर पूजा,गोंधळ आणि भंडारा करून जिर्णाेद्धाराचे लोर्कापण करण्यात आले.
४. या सोहळ्यासाठी शिवसमर्पण भावनेने देवकार्य करण्यासाठी प्रतिष्ठानच्या समवेत कार्य करणार्या संघटना, पोलीस निरीक्षक पाटील, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर, सर्वश्री वेल्हाळ, मानसिंग कदम, सचिन जगदाळे, सातप्पा किल्लेदार, विशाल पाटील अनिकेत हिरवे, आकाश पवार, अभिजित भालभर यांचा सत्कार-सन्मान करण्यात आला. याचसमवेत देवीचे परंपरागत पुजारी श्री. भोसले दांपत्य यांना कपड्यांचा अहेर करून अन्यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या संदर्भात ‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर म्हणाले, ‘‘आम्हा सर्वांना जोडणारा एक समान धागा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यावर आम्हा सर्व शिवप्रेमींची असलेली निष्ठा. या निष्ठेपोटीच लोकवर्गणीतून आम्ही हे काम उभे केले. या कामात आम्हाला अनेकांचे सहकार्य लाभले. या पुढील काळातही आमच्या आणखी योजना असून आम्ही त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ |