लहानपणी आपल्याला आईने घास भरवतांना चिऊताईच्या गोष्टीतून आपल्यामध्ये चिमणीविषयीचे ममत्व निर्माण केले. आज आपण मोठे झाल्यावर पहातो, तर भौतिक प्रगतीमुळे चिमण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वृक्षांवरील किंवा धान्यांवरील कीड वा अळ्या खाऊन निसर्गाचे संतुलन राखणारी चिमणी शहरात दिसेनाशी झाली आहे. पूर्वी चिमण्या कौलांच्या छताखाली घरटी बनवत. आता मात्र वाढत्या शहरीकरणामुळे काँक्रिटच्या इमारतींमध्ये ही जागाच लुप्त झाली आहे.
पारंपरिक शेती बंद झाल्याने चिमण्यांना ज्वारी-बाजरी यांसारखे पुरेसे धान्य उपलब्ध होत नाही. अन्नधान्यावर कीटकनाशके फवारणीमुळे दूषित खाद्य खाऊन चिमण्या मरत आहेत. वड-पिंपळ, उंबर यांसारखी वृक्षे नसल्याने चिमण्यांची हक्काची स्थाने नाहीत. हवेत ध्वनी आणि वायू प्रदूषण, जागतिक तापमानवाढ अशा वातावरणात चिमण्या जगू शकत नाहीत. भ्रमणभाषच्या ध्वनीलहरींमुळे चिमण्यांची अंडी न उबवताच खराब होतात, किंवा पिल्लू बाहेर आले तरी ध्वनीलहरींच्या प्रकोपामुळे ते उडण्यापूर्वीच मरून जाते, असेही संशोधनात उघड झाले आहे. ही आपण आपली प्रगती म्हणायची का ?
वर्ष १९५८ मध्ये चीनमधील शासनकर्ते माओ-त्से-तुंग यांनी ‘चिमण्यांसारखे पक्षी उपद्रवी असून त्यांना मारून टाकल्यास धान्यही वाचेल आणि आर्थिक प्रगतीही होईल’, असा तर्क लावून ‘पक्षी कत्तली’ची मोहीम राबवली. लाखो चिमण्या मारल्या. पुढे शेतात कीटकांचा संसर्ग वाढला, टोळधाड आली आणि दोन वर्षांतच धान्यांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घसरून दुष्काळ पडला. भूकबळीने लाखो बळी गेले. नंतर पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी ‘पक्षी वाचवा’ मोहीम हाती घ्यावी लागली.
निसर्गाचे चक्र पाहिल्यास भगवंताने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे. मानवाने भौतिक प्रगती करतांना कुणाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत नाही ना ? याकडे लक्ष द्यायला हवे. मग मनुष्य असो अथवा प्राणी ! हे लक्षात घेऊन निसर्गातील प्रत्येक सूक्ष्मातीसूक्ष्म जिवाचे नैसर्गिक जीवनचक्र चालवण्यात मोठा वाटा असतो. त्यांचे पालनपोषण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यामुळे आपणही उन्हाळ्यात चिमण्यांसाठी आगाशीत पाणी ठेवूया. त्यांच्यासाठी घरटे, खाद्य ठेवू शकतो. मुख्यतः आपली प्रगती म्हणजे दुसर्या जिवाची, निसर्गाची अधोगती करणे नव्हे !
– श्री. नीलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई