प्रवासी महिलेचे चुंबन घेणार्‍या व्यावसायिकाला १ वर्षाची शिक्षा

१० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – हार्बर मार्गावरील लोकल प्रवासात महिलेचे चुंबन घेणारे व्यावसायिक किरण होनावर यांना महानगर न्यायदंडाधिकारी यांनी व्ही.पी. केदार यांनी दोषी ठरवले आहे. हा प्रकार वर्ष २०१५ मध्ये घडला होता. १ वर्षाच्या सश्रम कारावासासह १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणी प्रत्यक्ष साक्षीदार असणारा महिलेचा मित्र आणि पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. यातील ५ सहस्र रुपयांची रक्कम पीडित महिलेला भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

‘लोकलमधून प्रवास करतांना महिलेला धक्का लागला आणि तोल जाऊन चुकून महिलेच्या गालाला माझ्या ओठांचा स्पर्श झाला’, असा युक्तीवाद आरोपीने केला होता; पण तक्रारकर्त्या महिलेने ‘आरोपी समोरील आसनावर बसून माझ्याकडे सातत्याने पहात होता’, असे म्हटले होते. या तक्रारीतील सूत्राची नोंद घेत न्यायालयाने आरोपीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

‘पुरुषांच्या तुलनेत महिलांना समोरच्या व्यक्तीचा हेतू पटकन लक्षात येतो. याला महिलांचे अंतर्ज्ञान म्हटले जाते. महिलांमध्ये गैरमौखिक इशारे समजण्याची जन्मजात क्षमता असते. त्यामुळे महिलेने अनावधानाने घडलेल्या चुकीविरोधात तक्रार केली’, असे म्हणता येणार नाही’, असे मत न्यायालयाने नोंदवले.