गोव्यात ठिकठिकाणी हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रा यांचे आयोजन

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

पणजी, ३ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात २ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ, विविध संप्रदाय, आदींनी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदूंनी उत्साहाने सहभाग घेऊन हिंदु नववर्षाचे स्वागत केले. राज्यात अनेक ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी सक्रीय सहभाग घेतला.

हिंदु नववर्ष स्वागत समिती आणि हिंदू रक्षा महाआघाडी, मुरगाव शाखा यांच्या वतीने संभाजीनगर (वास्को) येथे शोभायात्रेचे आयोजन

वास्को-द-गामा शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करून सांस्कृतिक आक्रमण रोखावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वास्को येथे नववर्षाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली शोभायात्रा

वास्को, ३ एप्रिल (वार्ता.) – ‘वास्को-द-गामा’ याचे वास्को-द- गामा शहराच्या जडणघडणीत कोणतेच योगदान नाही. गोव्यात धर्मांतराला आळा घालणारे धर्मवीर संभाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे. उत्तरप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे ‘अलाहबाद’ शहराचे ‘प्रयागराज’ असे नामकरण झाले, तसेच सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी आणि गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी ‘वास्को-द-गामा’ या शहराचे नावही ‘संभाजीनगर’ असे झाले पाहिजे. तसेच हिंदूंना भेडसावणार्‍या धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ आदी विविध समस्यांवर एकमेव उपाय म्हणून भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. वास्को येथील हिंदु नववर्ष स्वागत समिती आणि हिंदू रक्षा महाआघाडी, मुरगाव शाखा यांच्या वतीने आयोजित शोभायात्रेनंतर आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने श्री. रमेश शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला ‘इस्कॉन’चे श्यामरसिक दास महाराज यांची प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थिती होती. ‘इस्कॉन’चे श्याम रसिक दास महाराज यांचेही या वेळी मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाला मुरगावचे आमदार श्री. कृष्णा साळकर यांची उपस्थिती होती.

पणजी येथे सामूहिक गुढीपूजनानंतर झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित धर्मप्रेमी

नववर्ष स्वागत समिती, म्हापसा यांच्या वतीने सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव

गोमंतकियांनी स्वातंत्र्यसैनिक स्व. मोहन रानडे यांना विसरू नये ! – योगेश सोमण, अभिनेते

योगेश सोमण

म्हापसा – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची माहिती सर्वांसमोर आली आहे. हा चित्रपट हा केवळ चित्रपट आणि करमणूक नव्हे, तर ती एक चळवळ आहे. याच धर्तीवर आता ‘गोवा फाइल्स’ हा चित्रपटही येऊ शकतो; मात्र आपण गोवा मुक्तीलढ्यात बहुमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. मोहन रानडे यांचे योगदान विसरू नये. आपला इतिहास हा पराक्रमाचा आहे, तर पराभवाचा नाही, असे आवाहन ‘उरी-सर्जिकल स्टाईक’ या चित्रपटात तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची भूमिका साकारणारे ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक तथा कलाकार योगेश सोमण यांनी केले. नववर्ष स्वागत समिती, म्हापसा यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक गुढीपाडवा उत्सवात ‘भारतीय इतिहासातील सोनेरी पाने’ या विषयावर अभिनेते योगेश सोमण बोलत होते. तत्पूर्वी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. अभिनेते योगेश सोमण यांच्या मार्गदर्शनानंतर सनातन संस्थेचे श्री. शेखर आगरवाडेकर आणि ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे श्री. जयेश थळी यांनी अभिनेते योगेश सोमण यांची भेट घेऊन त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा गुढीपाडवा विशेषांक भेट दिला.

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग

१. करमळी येथे हिंदुत्वनिष्ठांनी प्रभातफेरी आणि सामूहिक गुढीपूजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले.

२. हिंदु जनजागृती समिती आणि शिरसई येथील ग्रामस्थ यांच्या वतीने शिरसई येथे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वैष्णवी सिनारी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

३. पोंबुर्फा आणि हळदोणा येथील कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले यांच्या गुढीपाडवा संदेशाचे वाचन करण्यात आले.

४. खोर्जुवे येथील किल्ल्यावर गुढी उभारण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ सौ. सुविद्या डिचोलकर यांनी स्वत: पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत यांनी ‘गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

५. पणजी येथील शोभायात्रेमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता.

. मये येथील श्री महामाया देवीच्या प्रांगणात वाहन फेरी आणि सामूहिक गुढीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या गुढीपाडवा संदेशाचे वाचन करण्यात आले.

७. नववर्ष स्वागत समिती, पेडणे यांच्या वतीने सामुहिक गुढीपूजन आणि प्रभातफेरी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी प्रमुख वक्ते या नात्याने मार्गदर्शन केले.

८. नववर्ष स्वागत समिती काणकोण, पैंगीण आणि गावडोंगरी यांच्या वतीने अनुक्रमे चावडी येथील गायतोंडे मैदान, पैंगीण येथील श्रद्धानंद पटांगण आणि गावडोंगरी येथील श्री मल्लिकार्जुन देवालय सभागृह येथे नववर्ष स्वागत सोहळे संपन्न झाले. चावडी येथील कार्यक्रमात गोवा विधानसभेचे सभापती श्री. रमेश तवडकर यांची उपस्थिती होती. पैंगीण येथील कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या गुढीपाडवा संदेशाचे वाचन करण्यात आले.

९. साखळी, होंडा, वाळपई, करमळी (आमोणा) आणि आसगाव येथेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता.


‘हिंदू रक्षा महाआघाडी’ यांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी नववर्षदिन कार्यक्रमाचे आयोजन

गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ, विविध संप्रदाय आदींचे संघटन करणार्‍या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ यांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंदु बांधवांनी निद्रिस्तपणा सोडून हिंदूसंघटन करण्यासाठी प्रयत्नशील होण्याविषयी कुडचडे येथील कार्यक्रमात जागृती करण्यात आली.

गोव्यात धर्मांतर बंदी कायदा आणा ! – अधिवक्ता शिवाजी देसाई

हिंदु धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हिंदु धर्माला श्‍वाश्‍वत मूल्यांचे अधिष्ठान आहे. हिंदु धर्मामध्ये संपूर्ण जगाला दिशा दाखवण्याचे सामर्थ्य आहे. हिंदु धर्मावर आज विविध माध्यमांतून आघात होत आहेत. गोव्यात हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे आणि हे रोखण्यासाठी धर्मांतर बंदी कायदा लागू केला पाहिजे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी सूडा मार्केट, कुडचडे येथे हिंदु नववर्ष समिती, कुडचडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना केले. कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधित केले.