मुलुंड (मुंबई) येथे ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले !

डावीकडून पू. (सौ.) संगीता जाधव आणि मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

मुंबई – सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे २९ मार्च या दिवशी ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुलुंड येथील ‘मुलुंड सेवा संघा’च्या सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर आणि सनातन संस्थेच्या पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सौ. धनश्री केळशीकर यांनी शिबिराचा उद्देश सांगितला. डॉ. (सौ.) सायली यादव यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केलेली सेवा आध्यात्मिक उन्नतीची दिव्य संधी कशी असते, याविषयी सांगितले. त्यानंतर सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर आणि संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. जिज्ञासूंनी साधना सत्संगाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिराचे सूत्रसंचालन सौ. रूपा सोलंकी यांनी केले.

साधनेमुळे सकारात्मक पालट होऊन जीवन आनंदी होते ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रसारक, सनातन संस्था

‘अध्यात्म’ हा शाश्वत विषय आहे. तो समजून घेऊन कृतीत आणायला हवा. जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे नामजप, प्रार्थना, सत्संग आणि सेवा या साधनेच्या प्रयत्नांसह आध्यात्मिक उपाय अन् स्वभावदोष निर्मूलन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यात सकारात्मक पालट होऊन जीवन आनंदी होते.

तीव्र तळमळीने याच जन्मात ईश्वरप्राप्ती होऊ शकते ! – पू. (सौ.) संगीता जाधव, सनातन संस्था

आपण किती वर्षे साधना करतो, याला महत्त्व नसून ईश्वराप्रती आपली किती ओढ आहे ? याला महत्त्व आहे. प्रकृतीप्रमाणे साधना करतांना त्याग वाढवला पाहिजे. त्यागातून ज्ञान मिळते. तीव्र तळमळ असेल, तर याच जन्मात ईश्वरप्राप्ती करता येऊ शकते.

मनोगत

१. सौ. मनीषा भुजबळ, घाटकोपर – कार्यशाळेत आल्यावर गेल्या १५ दिवसांपासून असलेला माझा क्षीण पूर्णपणे निघून गेला.

२. श्रीमती सविता तावडे, सांताक्रूझ – गेल्या जन्मीचे पुण्य म्हणून मला शिबिरात येता आले. पूर्वी दूरदर्शन पहाण्यात माझा पुष्कळ वेळ वाया जायचा. आता मी केवळ वृत्त पहाते. हा पालट केवळ सत्संगामुळे झाला आहे. सनातन संस्थेत जे मिळाले, ते कुठेही मिळणार नाही.

३. सौ. वैशाली मेहेत्रे, ठाणे – दोन दिवसांपासून शिबिराला येण्याची सिद्धता होती. अडथळे येऊ नये; म्हणून सतत प्रार्थना होत होती. येथे आल्यावर एवढे प्रेम मिळाले की, माहेरी आल्यासारखे वाटले.

४. सौ. सदिच्छा स्वस्तिक सावंत, वरळी – सत्संगात सांगितल्यानुसार स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यावर माझ्या स्वभावात पालट झाला. हा पालट यजमानांनाही जाणवला.

५. श्रीमती रत्नप्रभा खैरे, वाशी – पूर्वी मला पटकन राग यायचा. सत्संगामुळे आता माझ्या चुका मला कळू लागल्या.