चिनी रॉकेटचा भाग असण्याची शक्यता ! – खगोलतज्ञ

विदर्भात अनेक ठिकाणी आकाशात आगीचे गोळे आणि शेपटीच्या आकाराचा प्रकाश दिसल्याचे प्रकरण !

चंद्रपूर/अमरावती – नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि राज्यात अन्य काही ठिकाणी आकाशातून ४ आगीचे गोळे वेगाने शेपटीच्या आकाराच्या प्रकाशासह खाली येतांना २ एप्रिलच्या रात्री ८ वाजता दिसले. ‘हे नेमके काय आहे ?, याविषयी सर्वांमध्ये चर्चा होत होती; मात्र खगोल अभ्यासकांनी चिनी उपग्रहाचा किंवा रॉकेटचा सुटा भाग पडला असल्याची शक्यता वर्तवली आहे. अमरावतीजवळील आऱ्हाड-कुऱ्हाड गावातील शेतकऱ्यांनी हे दृश्य भ्रमणभाषच्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

आकाशात दिसत असलेला आगीचा लोळ चंद्रपूरपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील ग्रामपंचायतीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कोसळला. कोसळलेल्या ठिकाणी ८x८ आकाराची लोखंडी ‘रिंग’सदृश वस्तू आढळून आली आहे. सध्या ही ‘रिंग’ सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील समूद्रपूर तालुक्यातील वाघेडा ढोक शिवारातील नितीन सोलटे यांच्या शेतात सिलेंडरच्या आकाराचा अवशेष पडला असल्याचे लक्षात आले आहे. ३ ते ४ किलो वजनाची ही काळ्या रंगाची ही वस्तू पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे.

उपग्रहाचे किंवा चिनी रॉकेटचे सुटे भाग असण्याची शक्यता  ! – लीना बोकील, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

पुणे येथील नासाच्या ‘स्पेस एज्युकेटर’ (अवकाशतज्ञ) आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील म्हणाल्या की, २ एप्रिल या दिवशी घडलेली घटना नक्कीच उल्कापाताची नव्हती. ही घटना नैसर्गिक नसून मानवनिर्मित होती. एखाद्या उपग्रहाचे तुकडे किंवा चिनी रॉकेटचे सुटे भाग होऊन खाली कोसळले आहेत. या घटनेनंतर मी ‘एस्ट्रोनॉट कॅलेंडर’ (खगोलशास्त्रीय पंचांग) ही पाहिले, २ एप्रिल या दिवशी उल्कावर्षाव होण्याची शक्यता नव्हती. ज्या वेळी उल्कापात होत असतो, त्या वेळी त्याचा विद्युत् प्रवास पूर्णपणे नैसर्गिक असतो; पण हे पूर्णपणे मानवनिर्मित होते, हे निश्चित आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये चीनने रॉकेट ‘लॉन्च’ केले होते. त्याचे शेपूट सुटे होऊन पृथ्वीकडे येत होते.

उपग्रहाच्या ‘बुस्टर’चे तुकडे असण्याची शक्यता ! – श्रीनिवास औधकर, संचालक, एम्.जी.एम्.ए.पी.जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, संभाजीनगर

न्यूझिलंड येथील माहीया द्वीपकल्पावरून २ एप्रिलला भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.११ वाजता तेथील ‘रॉकेट लॅब’ आस्थापनाच्या ‘इलेक्ट्रॉन रॉकेट’द्वारे ‘ब्लॅकस्काय’ नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या ‘इलेक्ट्रॉन रॉकेट’च्या ‘बुस्टर’चेच तुकडे असावेत. आपल्या भागात साधारण ३०-३५ कि.मी. उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणाऱ्या घटनेचा मार्ग आणि प्रकाश यांचा अंदाज घेतला, तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी यांसारखी ही घटना निश्चित नाही.