तब्बल ३१ वर्षांनी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या विरोधात श्रीनगर न्यायालयात याचिका प्रविष्ट !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे बिट्टा कराटेच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीने पकडला जोर !

जे कार्य आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी करायला हवे, ते एका चित्रपटाने करून दाखवले. ही परिस्थिती देशासाठी लज्जास्पद !

काश्मिरी हिंदूंची हत्या करणारा आतंकवादी बिट्टा कराटे (उजवीकडे )

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंची हत्या करणारा आतंकवादी बिट्टा कराटे याच्या विरोधातील खटला पुन्हा चालू होऊ शकतो. ३० मार्च या दिवशी बिट्टाच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर श्रीनगरच्या एका न्यायालयात सुनावणी झाली. याचिकाकर्ता सतीश टिक्कू यांच्या परिवाराला याचिकेची प्रत प्रविष्ट करण्याचा न्यायालयाने आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ एप्रिल या दिवशी होईल.

१. सध्या अन्य एका प्रकरणात बिट्टा कराटे देहलीतील तिहार कारागृहात बंद आहे.

२. बिट्टा कराटेचे मूळ नाव फारूक अहमद डार असून त्याच्या विरोधात काश्मिरी हिंदूंसमवेत एकूण २० लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

३. बिट्टाने सर्वांत आधी त्याचाच मित्र असलेला काश्मिरी हिंदू सतीशकुमार टिक्कू याची हत्या केली होती.

४. ११ मार्च या दिवशी प्रसारित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने समाजमन ढवळून निघाले असून यात आतंकवादी बिट्टा कराटे याचे क्रौर्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणजे बिट्टा कराटे याच्या विरोधात सहस्रावधी हिंदूंनी कारवाई करण्याची विविध स्तरांवर मागणी केली आहे. त्याच्याविरोधात ट्विटरवर ‘ट्रेंड’ही करण्यात आला होता.