‘मार्गाचे काम चांगले व्हावे, यासाठी दायित्व निश्चित करावे’, अशी मागणी करावी लागणे म्हणजे ठेकेदार आणि अधिकारी दायित्वशून्यतेने वागत आहेत का ? असा प्रश्न कुणाला पडल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक
कणकवली – सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणारा करूळ घाटमार्ग सध्या दुरूस्तीच्या कामांसाठी बंद आहे. ही दुरूस्ती करतांना पुढील ५ वर्षे तो खराब होऊ नये; म्हणून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कामाचे दायित्व निश्चित करा. त्यांच्याकडून बंधपत्र (बॉण्डपेपर) लिहून घ्या. करूळ घाटमार्गाच्या गुणवत्तापूर्ण कामासाठी निरीक्षक नेमून त्याच्यावरही दायित्व द्या, अशी मागणी कासार्डे ‘सिलिका सँड’ (सिलिका वाळू) व्यावसायिक संघटनेचे कार्यवाह संजय पातडे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेच्या या निवेदनात म्हटले आहे की, मार्गाच्या दुरूस्तीसाठी करूळ घाट सध्या अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरून नियमित अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे प्रतिवर्षी या मार्गाच्या नुतनीकरणाचे काम केले जाते; मात्र काम केल्यानंतर ४ ते ६ मासच ते टिकते आणि पुन्हा मार्गावर खड्डे पडतात. यावरून हे काम चांगल्या दर्जाचे होत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे काम करणार्या संबंधितांवर मार्गाचे दायित्व सोपवणे आवश्यक आहे. (अवजड वाहतूक आणि घाटमार्ग असल्याने या मार्गाचे काम चांगल्या दर्जाचे होणे आवश्यक असतांना त्यात कुचराई करणारे ठेकेदार आणि अधिकारी यांची प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी ! – संपादक)