सत्ताधारी आणि विरोधकांतील राजकीय कुरघोडीमुळे विधीमंडळातील प्रश्नोत्तरांच्या कामकाजाचा वेळ वाया !

एकमेकांवर कुरघोडी करण्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ लोकप्रतिनिधींनी वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिका होय !

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – विधानसभा आणि विधान परिषद यांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यामुळे ४ मार्च या दिवशी दोन्ही सभागृहांत महत्त्वाच्या लक्षवेधी, तसेच तारांकित प्रश्न यांवर चर्चा होऊ शकली नाही. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

इतर मागासवर्गीय आरक्षणाविषयी ७ फेब्रुवारी या दिवशी चर्चा होईल, असे सत्ताधारी पक्षाने घोषित करूनही विरोधकांनी विरोध चालूच ठेवला. विरोधकांच्या या कुरघोडीला शह देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. सकाळी ११ वाजता विधानसभेचे, तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता चालू झाले; मात्र सभागृह चालू झाल्यावर दोन्ही सभागृहांत विरोधकांनी इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे विधानसभेचे २ वेळा एकूण ४५ मिनिटांसाठी, तर विधान परिषदेचे एक वेळा एकूण २० मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ चालू राहिल्याचे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

यामध्ये विधान परिषदेचे केवळ ३० मिनिटे, तर विधानसभेचे कामकाज केवळ ४५ मिनिटे आणि तेही गोंधळात पार पडले. दोन्ही सभागृहांत प्रत्येकी एका तारांकित प्रश्नावर गोंधळात चर्चा झाली. त्यानंतर तारांकित प्रश्नांचा वेळ वाया गेला. सभागृहातील गोंधळामुळे लक्षवेधीवरील चर्चाही रहित करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कृषीपंपांची वीजतोडणी, कृषीविषयक चर्चा, ‘औरंगाबाद’ शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे आदी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होऊ शकली नाही.