समाजवादी पक्षाचे कर्णावती बाँबस्फोटांतील आरोपींशी संबंध !

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप

केंद्रीय मंत्र्यांनी केवळ आरोप न करता केंद्र सरकारला याची चौकशी करण्यास सांगून त्याचा पाठपुरावा करावा, असेच जनतेला वाटते ! – संपादक

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव

नवी देहली – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी येथील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन एक छायाचित्र दाखवले. यात वर्ष २००८ च्या कर्णावती (गुजरात) येथील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणातील एका आरोपीचे वडील समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत दिसत आहेत. यावरून ठाकूर यांनी, ‘भाजपने नेहमीच आतंकवादाला तीव्र विरोध केला आहे, तर समाजवादी पक्ष आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. कर्णावती बाँबस्फोटांचा थेट संबंध या पक्षाच्या उत्तरप्रदेशातील नेत्यांशी होता’, असा आरोप केला. याप्रकरणी अखिलेश यांनी उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली.

कर्णावती येथील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी न्यायालयाने  इंडियन मुजाहिदीनच्या ३८ आतंकवाद्यांना फाशी, तर ११ आतंकवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या स्फोटांत ५६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २००हून अधिक जण घायाळ झाले होते.