आजपासून समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार !

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाचे प्रकरण

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

मुंबई – महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याची चेतावणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. दारूच्या दुकानात वाईन मिळते, मग सुपरमार्केटमध्ये परवानगी देण्याचे कारण काय ? दारूच्या दुकानात वाढ का करत आहात ? सर्वांनाच व्यसनाधीन बनवायचे आहे का ? लोक व्यसनाधीन झाले की राज्य सरकारला जे साधायचे असेल, ते साधता येईल; म्हणून हा निर्णय घेतला आहे, अशी टीकाही राळेगणसिद्धी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘आता तुम्ही सरकारला माझा एक निरोप पाठवा की, तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिलेली नाही. ‘एक्साईज’ विभागाचे आयुक्त मला भेटायला आले.  एक्साइज विभागाच्या राज्य सचिवांनी ‘पुढचे निर्णय लोकांना विचारल्याशिवाय घेणार नाही’, असे लिखित स्वरूपात दिले; पण मला त्यांच्यावर विश्‍वास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन आमची संस्कृती नाही. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी कीर्तनकार कीर्तन करतात; पण सरकार किराणा दुकानात वाईन ठेवून ती क्षणात धुळीस मिळवत आहे. हे सर्व बघून आता जगण्याची इच्छा होत नाही.’’