मद्य उत्पादनावरच बंदी हवी !

नोंद 

प्रतिकात्मक छायाचित्र

महाराष्ट्र सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्याला अनुमती दिली, हे समजताच अनेक क्षेत्रांतून सरकारवर टीका होऊ लागली. वाईन हा मद्याचाच प्रकार असतांना ‘वाईन म्हणजे देशी दारू नव्हे. वाईन आणि मद्य यांमध्ये जमीन-आस्मानचे अंतर आहे’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. वाईन हा मद्याचाच प्रकार आहे. त्यामुळे सरकारने ‘वाईन आणि मद्य वेगवेगळे’, असे सांगून राज्याच्या जनतेची दिशाभूल करू नये.

किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. ‘मद्यामुळे समाजातील अनेकांचे संसार धुळीस मिळाले, तरी चालतील; पण आम्ही हा निर्णय मागे घेणार नाही’, अशीच भूमिका शासनकर्ते घेत आहेत का? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? राज्यात महागाईने कळस गाठला आहे. कोरोनामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी संकटात आहेत. अशा अनेक जटील समस्या राज्यात असतांना सरकार स्वतःची तिजोरी भरण्यासाठी घेत असलेला निर्णय जनहितार्थ आहे का ?

वाईनमध्ये २५ टक्के अल्कोहोल, तर व्हिस्की, रम आणि व्होडका यांमध्ये त्याचे प्रमाण ४० टक्के असते. वाईन घेतल्यानंतर मद्यासारखी नशा चढू शकते. ‘राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दुर्घटना होऊ नये, यासाठी महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर वाईन विक्रीचे दुकान असावे’, असाही कायदा आहे. मग किराणा दुकानात वाईन विक्री केल्यास दुर्घटना वाढणार नाहीत का ? ‘वाईन हे कायद्यानुसार प्रतिबंधित उत्पादनात मोडते. त्यामुळे हा मद्याचाच प्रकार आहे’, असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येते.

वाईन पिण्याचा परवाना वयाच्या २५ व्या वर्षी मिळतो. त्यामुळे वाईन हा नशेचाच पदार्थ आहे. एखाद्या निर्णयाला प्रारंभी विरोध होतो; परंतु काही दिवसांनंतर तो मावळतो. जे निर्णय जनहितकारी नाहीत, त्यामध्ये यश येईपर्यंत लढण्याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. या निर्णयासमवेत मद्य उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी कशी येईल, याकडेही लक्ष द्यावे, हीच जनतेचा भावना !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.