‘व्हॅलेंटाईन डे’ या नव्या सामाजिक समस्येला आळा घाला !
रत्नागिरी – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी या नव्या सामाजिक समस्येला आळा घालावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी भारतात प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे आजची युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत. या समस्येला आळा घालावा.
येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हे निवेदन येथील उप निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
तसेच येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल कुलकर्णी, तसेच मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद शेखर, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. किशोर लेले, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र कांबळे यांनाही विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
हे निवेदन देते वेळी श्री काशी विश्वेश्वर देवस्थान राजिवडा रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. कैलास विलणकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. देवेंद्र झापडेकर, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चंद्रशेखर गुडेकर, पुरुषोत्तम वागळे, धुपकर आणि संजय जोशी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीद्वारे देण्यात येणारी निवेदने –
(निवेदने वाचण्यासाठी संबंधित निवेदनावर क्लिक करा)
‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथांविषयी प्रबोधन होणे आवश्यक ! – प्राचार्य प्रफुल्ल कुलकर्णी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
येथील हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल कुलकर्णी यांना निवेदन दिल्यानंतर प्राचार्य कुलकर्णी म्हणाले की, ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या कुप्रथांविषयी समाजात, तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती चांगले काम करत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात सध्या निर्बंध असल्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्रितपणे संबोधित करता येऊ शकत नाही; मात्र तुम्ही दिलेले निवेदन आम्ही ‘नोटीस फलका’वर लावतो.
युवा पिढीमध्ये राष्ट्राभिमान निर्माण व्हावा, यासाठी समितीने ‘क्रांती गाथा प्रदर्शन’ बनवले आहे, याविषयी माहिती दिल्यानंतर प्राचार्य कुलकर्णी म्हणाले की, तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या कुप्रथे विरोधातील प्रबोधन करणारे फ्लेक्स फलक महाविद्यालयाच्या आवारात लावू शकता. ते वाचून विद्यार्थ्यांचे प्रबोधन होऊ शकेल.
यानंतर लगेचच समितीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ संदर्भातील निवेदन विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी महाविद्यालयाच्या ‘नोटीस बोर्ड’वर लावण्यात आले.