विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवण्याच्या अनैतिक कृत्याचे साम टी.व्ही.च्या वृत्तसंकेतस्थळाकडून अश्लाघ्य समर्थन !

  • विवाहपूर्व शारीरिक संबंधांचे समर्थन करणारी वृत्तवाहिनी पत्रकारितेला कलंकच होय ! – संपादक
  • समाजाला दिशा देणारी नव्हे, तर समाजाला अधोगतीकडे नेणारी ‘साम टी.व्ही.’ची समाजद्रोही पत्रकारिता ! – संपादक 
  • भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात समाजाला व्यभिचारी बनवणारी पत्रकारिता लज्जास्पद ! मानवी सभ्यता नव्हे, तर पशूवत अनिर्बंध जीवनाचा पुरस्कार करण्यास समाजाला प्रवृत्त करणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ? – संपादक

मुंबई, २६ जानेवारी (वार्ता.) – ‘लग्नापूर्वी शारीरिक संबंध लाभाचेच; नाते आनंदी आणि बळकट होण्यास साहाय्य’, असा मथळा असलेले वृत्त ‘साम टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर २४ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले. (केवळ शारीरिक संबंधांमुळे नाही, तर जोडीदारांमध्ये प्रेम, विश्वास आणि आदर असला, तर विवाह टिकतात. हिंदु कुटुंबपद्धतीत हे साध्य होत असल्यामुळे ती अजूनही जिवंत आहे. हे लक्षात न घेता स्वैराचाराला खतपाणी घालणारे वृत्तसंकेतस्थळ जनहित काय साधणार ? – संपादक) हा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आल्याचा संदर्भ या वृत्तामध्ये देण्यात आला आहे. ‘हे सर्वेक्षण नेमके कुणी केले ?’, याविषयी काहीही माहिती न देता अनैतिकतेकडे नेणार्‍या सर्वेक्षणाचे मात्र ‘साम टी.व्ही.’ने समर्थन केले आहे.

या वृत्तात पुढे म्हटले आहे,

१. आधुनिकतेच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या भारतात आजही लग्नाआधी लैंगिक संबंधांविषयी रूढीवादी विचारप्रवाह आहेत. आजही ९० टक्के कुटुंबांना असे वाटते, ‘आपल्या सुनेने लग्नाआधी कुणाशीच शारीरिक संबंध ठेवलेले नसावेत’. अशा प्रकारे ‘साम टी.व्ही.’ने या सर्वेक्षणातील अनैतिकतेचे समर्थन केले आहे. (विवाहसंस्थेच्या निर्मितीचा एक उद्देश अनिर्बंध स्वैराचाराला आळा घालणे हाही आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनिर्बंध वागण्याने ‘विवाह’ या संकल्पनेलाच तडा जातो ! – संपादक)

२. या सर्वेक्षणातील निकर्षात म्हटले आहे, ‘लग्नापूर्वी संबंध ठेवणे वाईट नाही. भारतात अद्यापही हा चर्चेचा आणि वादाचा विषय आहे. तरुण वयात आल्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे.’ (आज पाश्चात्त्य देश स्वैराचाराला कंटाळून कुटंबव्यवस्थेचा पुरस्कार करत आहेत, हे ‘साम टी.व्ही.’ला ठाऊक नाही, असे वाटते ! – संपादक)

३. ‘तज्ञांचे म्हणणे आहे, ‘लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे भीती आणि संकोच रहात नाही. नात्यामध्ये समजूतदारपणा येतो आणि नाते टिकायला साहाय्य होते.’ (या सर्व गोष्टी विवाहनंतरही साध्य होतच असतात, त्यासाठी विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगणे हास्यास्पद आहे ! – संपादक) अशा प्रकारे अनेक अकलेचे तारे या सर्वेक्षणात तोडण्यात आले असून ‘साम टी.व्ही.’ने या त्याला सकारात्मक प्रसिद्धी दिली आहे.

वाचकांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन ‘साम टी.व्ही.’च्या वृत्तसंकेतस्थळाला सुनावले !

‘साम टी.व्ही.’ने दिलेल्या या वृत्ताच्या खाली वाचकांनी पुढील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

१. आपली भारतीय संस्कृती आहे, याचे तरी भान ठेवा !

२. ज्या बातमीदाराने ही बातमी दिली आहे, त्याच्या मुलीने असे केले, तर त्यांना चालेल का ?

३. स्वत:च्या बहिणीला आणि बायकोला अशी बातमी वाचायला देणार का ?