‘वाघ्या फाऊंडेशन’ आणि मनसे यांच्या विरोधानंतर मोकाट फिरणार्‍या गोवंशियांचा लिलाव रहित !

‘वाघ्या फाऊंडेशन’ने जनावरांच्या देखभालीचे दायित्व स्वीकारले !

नगर – येथील महानगरपालिका रस्त्यावर मोकाट फिरणारी गोवंशीय जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. जी जनावरे सोडवण्यासाठी त्यांचे मालक येत नाहीत, अशा जनावरांचा लिलाव महानगरपालिकेद्वारे केला जातो. याला विरोध ‘वाघ्या फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला होता. त्यानंतर ‘या गोवंशियांच्या देखभालीचे दायित्व कुणी घेत असल्यास लिलाव रहित केला जाईल’, असे आश्वासन उपायुक्त डांगे यांनी दिल्यानंतर ‘वाघ्या फाऊंडेशन’ने हे दायित्व स्वीकारले आहे. त्यामुळे १७ जानेवारी या दिवशी होणारा लिलाव रहित झाला आहे.

१. महापालिका कोंडवडा विभागाने वर्तमानपत्रात विज्ञापन देऊन १७ जानेवारी या दिवशी महापालिकेच्या कोंडवडा विभागाच्या कह्यात असलेल्या गोवंशीय जनावरांचा लिलाव ठेवला होता. या लिलावास ‘वाघ्या फाऊंडेशन’ने आक्षेप घेतला होता.

२. सुमित वर्मा यांनी महापालिकेत आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत लिलाव प्रक्रिया थांबवण्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा ठेका धरला होता. याचवेळी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा चालू होती. सभेमध्ये आलेले शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे आणि सुमित वर्मा यांची चर्चा झाली.

३. गणेश कवडे यांनी या प्रश्नाविषयी महानगरपालिकेच्या सभेत प्रश्न उपस्थित करत कायद्यानुसार अशी गोवंश जनावरे मनपा प्रशासन लिलाव करू शकत नाही, तसेच ही जनावरे शेतकर्‍यांऐवजी पशूवधगृहात गेली तर याचे दायित्व कोण घेणार ? असा प्रश्न करत, या लिलावला विरोध केला. (कायद्यानुसार गोवंशीय जनावरांचा लिलाव करता येत नाही, तर महापालिका लिलाव कसा काय करते ? संबंधितांना याविषयी विचारून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असेच गोरक्षकांना वाटते. – संपादक)

४. महापालिकेचे उपायुक्त डांगे म्हणाले, ‘‘कुणी गोवंशियांचे दायित्व घेणार असल्यास त्यांना ते देऊ.’’

५. ‘वाघ्या फाऊंडेशन’ने सिद्धता दर्शवल्यानंतर महासभेत महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, गणेश कवडे आणि इतर नगरसेवक यांनी केलेल्या चर्चेनंतर ही जनावरे ‘वाघ्या फाऊंडेशन’ला देण्यात यावी, असा ठराव झाला. १७ जानेवारी या दिवशीचा लिलाव रहित झाला असून ‘वाघ्या फाऊंडेशन’च्या पाठपुराव्याला आणि गोवंशीय जनावरांना वाचवण्यात मोठे यश आले आहे.