दगडफेकीत ११ जण घायाळ, वन विभागाकडून हवेत गोळीबार !
हिंगोली – ५ जानेवारी या दिवशी सकाळी जिल्ह्यातील पातोंड येथे वनभूमीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केली. यामध्ये वन विभागाच्या २ अधिकार्यांसह ११ जण घायाळ झाले आहेत. (कायद्याचा धाक संपला आहे, याची ही घटना निदर्शक आहे ! – संपादक) जमावाला नियंत्रित करण्यासाठी वन विभागाने हवेत गोळीबार केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. वन विभागाने प्रत्युत्तरात केलेल्या लाठीमारामध्ये २ गावकरी घायाळ झाले आहेत. गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. या प्रकरणात दगडफेक करणार्यांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे, असे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
वन विभागाच्या पातोंडा शिवारात असलेल्या ३३ एकर भूमीवर ९ अतिक्रमणधारकांनी पिकांची पेरणी करून भूमीवर झोपड्याही बांधल्या होत्या. वन विभागाच्या अधिकार्यांनी या ९ जणांना १ मासापूर्वी नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र त्यानंतरही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेच नाही, शिवाय त्या ठिकाणी पुन्हा पेरणीच्या हालचाली चालू केल्या होत्या.
वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, विनोद जांभुळे यांच्यासह ३० जणांचा ताफा जेसीबी यंत्रणेसह पातोंडा शिवारात अतिक्रमण काढण्यासाठी गेला होता.