हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ ‘मनुस्मृती’चे हिंदुद्रोह्यांकडून दहन !

  • मनुस्मृति ही स्त्रीविरोधी असल्याचे सांगणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट !

  • मनुस्मृतीच्या विरोधात आणि त्याच्या समर्थनार्थ ट्विटरवर ‘ट्रेंड’ !

  • कोणताही धर्मग्रंथ जाळणे, हा कायद्याने गुन्हा आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ जाळला जात असतांना आणि त्याविषयी सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित केले जात असतांना पोलीस झोपा काढत आहेत का ? – संपादक
  • हिंदूच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा करणे अत्यावश्यक झाले आहे. भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता संघटित होऊन अशी मागणी करायला हवी ! – संपादक
‘बीबीसी हिंदी’च्या माजी पत्रकार मीना कोतवाल

नवी देहली – २५ डिसेंबर या दिवशी ‘मनुस्मृति दहन दिवस’ या नावाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा दिवस साजरा करण्याचे काही हिंदुद्रोह्यांनी आवाहन केले. यामध्ये ‘बीबीसी हिंदी’च्या माजी पत्रकार मीना कोतवाल यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्याचा व्हिडिओ ट्विटरद्वारे प्रसारित केला आणि समाजाला मनुस्मृति जाळण्याचे प्रक्षोभक आवाहन केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘मी आज ज्याप्रकारे मनुस्मृतीचे दहन केले, तसे तुम्ही केले का ? असे करण्यात पुष्कळ मजा आहे. आता आपण असे नियमित करत जाऊ आणि केवळ तिचे दहन न करता तिच्यातील विचारांनाही नष्ट करून टाकू. बाबासाहेब (आंबेडकर) यांनीही हेच केले होते.’ (एकांगी माहिती प्रसारित करणार्‍या कोतवाल ! घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले असले, तर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ सिद्ध केले. कोतवाल यांच्यासारख्या हिंदुद्रोही महिला ही गोष्ट जाणीवपूर्वक लपवून ठेवत आहेत, हे लक्षात घ्या !  – संपादक)

मीना कोतवाल यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटले, ‘‘जो नीच मनू महिला आणि क्षूद्र यांना प्राणीसमान समजायचा, त्या मनूला मी ‘महानीच’ म्हणीन. जो ग्रंथ भेदभावावर आधारित आहे, त्याला जाळल्याने तुम्हाला वाईट का वाटते ?’’

वरील व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. – संपादक

मनुस्मृतीच्या दहनाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचा ट्विटर ट्रेंड !

यानंतर ट्विटरवर ट्रेंड ‘#मनुस्मृति_दहन_दिवस’ आणि ‘#हम_मनुस्मृति_दहन_करेंगे’ अशा प्रकारे हिंदुद्रोह्यांकडून ट्विटर ट्रेंड (ट्विटरवर एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा.) करण्यात आले. यांत अखिल भारतीय परिसंघ आदी हिंदुविरोधी संघटनांनी त्याच्या समर्थनार्थ ट्वीट्स केल्या. याला प्रतिवाद करण्यासाठी  हिंदुत्वनिष्ठांनीही मनुस्मृति या महान आध्यात्मिक ग्रंथाचे महत्त्व प्रतिपादणार्‍या ट्वीट्स करत ‘#हम_मनुस्मृति_पूजेंगे’ या हॅशटॅगने ट्रेंड केला. त्याला भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन प्राप्त झाले. (आता ‘ट्रेंड’ करून जागृती करण्यासमवेतच प्रत्यक्ष आंदोलन करून हिंदुविरोधी तत्त्वांना वैध मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)